
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने तातडीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि नव्याने मराठा आरक्षणाचा अध्यादेश कसा काढता येईल याचा तातडीने विचार करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडतर्फे करण्यात आली. हा प्रश्न सामाजिक असून विरोधी पक्षाने राजकारण करू नये, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर यांनी पत्रकार परिषदेत ही मागणी केली. संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे,अॅड. अतुल पाटील यावेळी उपस्थित होते. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठीही केंद्र सरकारने राज्य सरकारबरोबर प्रयत्न करावेत आणि मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवावी, असे पासलकर म्हणाले.
‘मराठा आरक्षणावर स्थगिती आल्यानंतर या प्रश्नावरून विरोधी पक्षातील भाजपचे नेते सरकारवर सातत्याने टीका करताना दिसत आहेत. मात्र, राजकारण करायला हा काही राजकीय प्रश्न नाही. हा सामाजिक प्रश्न आहे. या प्रश्नावरून विरोधी पक्षाने राजकारण न करता, मराठा समाजातील मुलांच्या भविष्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारबरोबर सगळ्यांनी एकत्रितपणे लढा देणे आवश्यक आहे,’ असेही पासलकर यांनी सांगितले.






























































