
आयुष्याच्या वाटेवर आपल्याला अनेक व्यक्ती भेटतात, त्यातील काही व्यक्ती कायमच्या मनात घर करतात. मला माझ्या आजवरच्या प्रवासात अशा असंख्य व्यक्ती भेटल्या, पण काही खास व्यक्ती अशा भेटल्या की, ज्यांनी माझं आयुष्य एका वेगळय़ा अर्थाने समृद्ध केलं. नावं घ्यायची म्हटली तर यादी संपता संपणार नाही. सांगताहेत ज्येष्ठ अभिनेते जयंत वाडकर…
तसा मूळचा माझा पिंड क्रिकेटरचा, पण सतीश पुळेकरांनी माझ्यातले अंगभूत कलागुण नेमके हेरून मला इंडस्ट्रीमध्ये आणलं, एकांकिकेचं व्यासपीठ खुलं करून दिलं. तिथेच मला विजय पाटकर, प्रदीप पटवर्धन असे अनेक जीवाभावाचे यार मिळाले. पुळेकर म्हणजे शब्दशः अभिनयाचं चालतं बोलतं व्यासपीठ. रंगमंचावर कसं उभं राहायचं, आवाज कसा चढवायचा, कुठे थांबायचं इथपासून ते थेट श्वास कुठे घ्यायचा इथपर्यंत सार शिकवलं.
वेगवेगळय़ा पद्धतीने आरशासमोर उभे राहून कसे चेहरे वेडेवाकडे करायचे, तोंड बंद ठेवून तर कधी किंचित उघडून, जीभ मध्ये घेऊन काही काही वाक्यं कशी उच्चारायची असे एक ना अनेक एक्सरसाइज ते सतत देत राहायचे, न थकता न चिडता सातत्याने ही शिकवणी चालू असायची. प्रयत्नांची पराकाष्ठा करणं म्हणजे नेमकं काय हे त्यांच्याकडूनच मी शिकलो. एखादी गोष्ट येत नसेल तर न कंटाळता, न थकता, जिद्दीने तिचा पाठपुरावा केला आणि त्यात सातत्य ठेवलं तर ती निश्चितच जमते हे त्यांनी मनावर बिंबवून दिलं आणि त्याची प्रचीती मला आजही येते.
वाचून तुम्हाला गंमत वाटेल कदाचित, पुळेकर सर आम्हाला खुर्ची घेऊन टाचेवर चालायला लावायचे, कॉलेजच्या कॉरिडोरमध्ये सुरुवातीला खूप कंटाळा यायचा. हे काय करतोय आपण? नेमकं काय साध्य करतोय आपण हे करून? असा प्रश्न सतत मनाला पडायचा. हातात खुर्ची घेऊन चालायचं, तेही कित्येक फूट आणि तेही टाचेवर ही मोठी जिकिरीची कसरत होती. त्यांनी त्याचं महत्त्व समजावून सांगितले.
विजय पाटकर… मित्र असावा तर असा! खास माझ्यासाठी आणि पटय़ासाठी त्यानं अनेक वेळा दर्जेदार लिखाण केलं. आमच्याकडून खणखणीत अभिनय करवून घेतला. आमचं आयुष्य म्हणजे जणू एक उघडं पुस्तकच. माझ्यातलं टॅलेंट अचूक ओळखून त्याला पूरक असं लिखाण तो सतत करत गेला.
मागच्या आठवडय़ात मी एका शीतपेयाची जाहिरात केली. ऑफर आल्यावर ती नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. कारण त्यात होते दस्तूरखुद्द अमिताभ बच्चन. त्यांना भेटल्यावर मी ‘तेजाब’च्या सक्सेस पार्टीच्या वेळेला त्यांच्या हातून घेतलेल्या ट्रॉफीची आठवण करून दिली. त्यावर ते ओळखीचे हसले आणि म्हणाले ‘‘हां हां, है याद मुझे भाई.’’
या जाहिरातींच्या चित्रीकरणादरम्यान त्यांच्या स्वभावाचे, व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू मला जवळून पाहता आले, जे माझ्या मनावर छाप पाडून गेले. खूप शिकण्यासारखं आहे त्या माणसाकडून. एक कलाकार म्हणून तर आहेच, पण एक माणूस म्हणूनसुद्धा. माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं आणि ते नेमकं कसं वागावं हे त्यांच्याकडून शिकावं. सेटवर अगदी स्पॉट बॉयपासून ते दिग्दर्शकापर्यंत सर्वांशी ते फारच नम्रतेने वागत होते. ते कधीच विसरता येणार नाही.
महेश मांजरेकर ही केवळ आठ अक्षरे नसून माझ्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. मध्यंतरी एका मुलाखतीदरम्यान महेश मांजरेकर यांना विचारलं की, तुमच्या प्रत्येक चित्रपटात तुम्हाला जयवंत वाडकरच का लागतात? त्यावर मोठय़ा मिश्किलीने उत्तर महेश मांजरेकर यांनी दिलं. ते असं की, जसं कोणताही चित्रपट बनवायला कलाकार लागतात, लेखक लागतो, दिग्दर्शक लागतो, कोरिओग्राफर लागतो, सिनेमॅटोग्राफर लागतो तसेच मला जयवंत वाडकर लागतो. ही मुलाखत पाहिल्यावर मला भरून आलं. एखाद्या व्यक्तीने समोरच्या व्यक्तीला मान द्यायचा, त्याचा आदर करायचा म्हणजे कसं याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच महेश मांजरेकर.
जयंत सावरकर यांचे नाव मी आवर्जून घेईन. साहित्य संघाची माझी ओळख करून दिली ती सावरकर सरांनी. ‘घर घर’ नावाचं नाटक होतं. माझा दमदार आवाज हे माझं सर्वात मोठे बलस्थान आहे, ही जाणीवही त्यांनी करवून दिली.
शब्दांकन – निनाद पाटील























































