
>>मानसी पिंगळे
अभिनेत्री सुरभी हांडे ही जितकी स्लिम अॅण्ड ट्रिम आहे, तितकीच फुडीसुद्धा आहे. तिला आवडते ते ती सगळे खाते. खाण्यापिण्याच्या बंधनात न अडकता ती तिचा फिटनेस सांभाळते.
सुरभी म्हणते, फिटनेस सांभाळायचा म्हणजे फक्त खाण्यावर बंधन आणून नव्हे तर खाण्यावर नियंत्रण ठेवून अन् जास्तीत जास्त व्यायाम करून सांभाळावा. त्यामुळे आवडेल ते सगळे खा फक्त खाण्याच्या वेळा पाळा.
सुरभी सकाळचा नाश्ता शक्यतो टाळते. बहुतेकदा करतच नाही. सकाळी उठून नाश्ता करण्यापेक्षा शरीरात ऊर्जा निर्माण होणे गरजेचे आहे. सकाळी उठल्या उठल्या व्यायाम केल्याने शारीरिक ताण कमी होतो अन् काम करण्याचा उत्साह येतो. व्यवस्थित आणि नियमित पाळली जाणारी गोष्ट म्हणजे रात्री कितीही भूक लागली तरीही सुरभी काहीच खात नाही. गोड कुणाला आवडत नाही. सुरभीला चॉकलेट्स फार आवडतात. साखरेचे प्रमाण कमी असणारे गोड पदार्थ शरीरासाठी उपयुक्त म्हणून ती फार कमी प्रमाणात साखर वापरते, किंबहुना साखर वापरतच नाही. ती सगळय़ा गोड पदार्थांमध्ये गुळाचा वापर करते. तिला गोड पदार्थांमध्ये श्रीखंड आणि गाजरचा हलवा फार आवडतो. पूर्णपणे गुळाचा वापर करून जवळपास एक डब्बा भरून ती गाजरचा हलवा बनवूनच ठेवते आणि रोज एक एक वाटी जेव्हा इच्छा होईल तेव्हा खायचा. सुरभीचे घरच्या जेवणावर जास्त प्रेम आहे.
स्ट्रीट फूडबद्दल सांगायचे झाले तर सुरभीला तिखट, झणझणीत पाणीपुरी आवडते, त्यावरून कांदा. तिला जेवताना कांदा लागतोच. त्याचबरोबर गरमागरम समोसे, कचोऱया तिच्या आवडीचे पदार्थ. सुरभीने गेल्या वर्षी थर्टी फस्टला चिकन खाणे सोडले. त्यामुळे शक्यतो शाकाहार, पहिल्या वाफेवर शिजवलेली भाजी, तव्यावरचा गरम गरम फुलका अन् त्यावर तुपाची धार अशा प्रकारच्या जेवणाला तिची पहिली पसंती. भाज्यांमध्ये तिला कारल्याची भाजी प्रचंड आवडते. सुरभी जितकी फुडी आहे त्याहून चविष्ट स्वयंपाक बनवते. तिला संपूर्ण स्वयंपाक करता येतो. एकदा एके ठिकाणी तिने सोया चॉप खाल्ले असता, दरवेळी बाहेरचे खाणे अशक्य म्हणून असे सोया चॉप आपल्यालाही बनवता येणे गरजेचे आहे असे म्हणत ती आज एकापेक्षा एक चविष्ट पदार्थ बनवून सर्वांना खाऊ घालते.
हरभऱयाची उसळ, मटकीची मिसळ, पुरणपोळी, गाजर हलवा, तिळगुळाची पोळी हे पदार्थ सुरभी प्रचंड चविष्ट बनवते. घरी येणारे पाहुणे आवर्जून तिच्या हातच्या या पदार्थांची मागणी करतात. सुरभीच्या सासूबाईंच्या हातचा ‘खानदेशी वरण बट्टी घोटलेली वांग्याची भाजी’ हा पदार्थ तिला प्रचंड आवडतो. सासरी चार दिवस जरी गेली तरी चारही दिवस खाऊ शकेल इतके या पदार्थावर प्रेम आहे. सुरभीसाठी आईच्या हातचा पांढरा पुलाव म्हणजे तिच्यासाठी ऑल टाइम फेवरेट. सुरभी म्हणजे अस्सल खवय्यी.




























































