
अभिनेत्री तेजश्री जाधव गेल्या अनेक वर्षांपासून बॉलीवूडमध्ये सक्रिय आहे. मराठमोळय़ा तेजश्रीने 2016 साली प्रदर्शित झालेल्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या ‘अकिरा’ चित्रपटाद्वारे बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘अट्टी’ चित्रपटात प्रभावी भूमिका साकारली. या चित्रपटाच्या माध्यमातून टॉलीवूडमध्ये प्रवेश केला.
तेजश्रीने तिच्या उल्लेखनीय अभिनय कौशल्याने ओटीटीवरदेखील प्रेक्षकांची मने जिंकली. ‘माधुरी टॉकीज’ या वेब सीरिजमध्ये तिने स्वीटीची व्यक्तिरेखा साकारली. हे यशस्वी टप्पे पार केल्यानंतर तेजश्री अलीकडेच ‘द जोकरः अ स्ट्रेंज किडनॅपर’ या वेब सीरिजमध्ये दिसली. हितेन तेजवानी आणि मंगेश देसाई यांसारख्या अभिनेत्यांसोबत ती स्क्रीनवर झळकली. तामीळ आणि तेलुगू इंडस्ट्रीमध्येही तिने आपली छाप पाडली आहे. दाक्षिणात्य चित्रपटातील पोलिसांच्या भूमिकेतील तिचा एक फोटो नुकताच व्हायरल झाला आहे. तिच्या आगामी प्रोजेक्टमधील हा फोटो असल्याचे समजते.
तेजश्री जाधव हिने हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपट, वेबसीरीज यामध्ये अभिनयाची झलक दाखवली आहे. आगामी काही मोठे प्रोजेक्ट तिच्या हाती आहेत. ती तमिळ बिग बॉसमध्ये सहभागी होण्याची चर्चा आहे.




























































