परीक्षण – जगण्याची गोष्ट म्हणजे उसवण

>>प्रशांत गौतम

शिवणकाम करीत लेखन करणारा धाराशीव जिह्यातील तुळजापूरचा युवा लेखक देविदास सौदागर यांना उसवण कादंबरीसाठी यंदाचा साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झाला. मराठवाडय़ात याआधी रवी कोरडे व वीरा राठोड यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

पुण्याच्या देशमुख अँड कंपनीने देवीदास सौदागर यांची `उसवण’ ही कादंबरी प्रकाशित केली. लेखक आणि कादंबरी प्रकाश झोतात आले. त्यांचा आजवरचा आयुष्याचा आणि लेखनाचा प्रवास हा अत्यंत प्रतिकूल परिस्थिशी संघर्ष करीतच झाला आहे. शिंप्याच्या संघर्षाच्या वास्तवाची ही कादंबरी आहे. घरात पिढय़ानंपिढय़ा हलाखीची परिस्थिती असते, त्यात आजही काही सुधारणा नाही. अशा वातावरणात त्यांनी वाचन, लेखनाचा छंद जोपासला. या जगण्याची गोष्ट म्हणजेच ही उसवण कादंबरी. त्याचा पारंपरिक टेलरिंगचा व्यवसाय रेडीमेडच्या आाढमणामुळे जवळपास बुडाला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली, ती व्यथा-वेदना लेखकाने कादंबरीत प्रभावीपणे मांडली आहे.

देविदासची ही यशकथा मोठी प्रेरणादायी आहे. एका रात्रीत मोठा होणारा हा लेखक नाही. देविदास यांचे प्राथमिक शिक्षण रामवरदायिनी शाळेत, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण कुलस्वामिनी विद्यालयात झाले. मुक्त विद्यापीठातून इतिहासात एम.ए. केले, पण शिकत असतानाच आजोबा, वडिलांचा पारंपरिक टेलरिंग व्यवसाय पुढे नेला. तुळजापूरच्या हडको भागात त्यांचे दुकान आहे. तुळजापूरच्या या युवा लेखकाचे 2018 साली `कर्णाच्या मनातलं’, 2021 साली `काळजात लेण्या कोरताना’ हे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले. लहानपणापासून लेखन-वाचनाची तर त्याला आवड होतीच. कवितेतून सुखदु:खाच्या भावना मांडता येतात; पण त्याला मर्यादा येतात. एखादी दीर्घ गोष्ट सांगायची तर कथा-कादंबरी हा साहित्य प्रकार व्यक्त होण्यासाठी मोठे व्यासपीठ असते.

`उसवलेल्या जगण्याला विविध रंगांच्या धाग्यांनी सांधत गेलं की जगणं रंगीन होतं. स्वत कितीही फाटके असा पण समोर आलेल्या दुःखी, त्रस्त माणसाचं दुःखं, वेदना तुम्हाला जाणवत असतील तर आपल्यातला शिंपी नक्कीच जिवंत आहे. तुम्ही त्या माणसाच्या दुःखाला जगण्याच्या वेगवेगळ्या रंगानी शिवून आनंदी करू शकता. विठू, त्याची पत्नी गंगा, मुलगी नंदा, मुलगा सुभाष हे चौरस कुटुंब अगदी हलाखीच्या परिस्थित जगत असताना आपल्या गरिबीला तोंड देत, दुसऱ्यांच्या डोळय़ांतल्या दुःखाला मात्र आपलंसं करत जगत असतात. आपण गरीब आहोत म्हणून आपण काहीच करू शकत नाही या विचारांना बाजूला सारून विठू शिंपी जमेल तशी लोकांना मदत करत असतो. वेडय़ा असणाऱया माणसाला तो फुकट कपडे शिवून देताना किंवा म्हातारीला पिशवी शिवून देताना होणारा आनंद त्याच्या मनाच्या श्रीमंतीचं दर्शन घडवून जातो.

आपण मनाने चांगले असलो तरी आपल्या अवतीभवती अनेक वेगवेगळी माणसं आपला गैरफायदा घ्यायला टपलेली असतात. या पुस्तकातल्या 2-3 घटना समाजातील चालू स्थितीवर प्रकाश टाकणाऱ्या आहेत. गावकऱ्यांचा विठूविषयी असलेला जिव्हाळा, त्यांच्याविषयी असलेली आपुलकी, हा धंदा बंद केल्यास त्यांच्या मनाची होणारी कालवाकालव, विठूप्रमाणेच शिंपी असलेले त्याचे मित्र त्यांची झालेली दयनीय अवस्था या आणि अशा अनेक प्रश्नांनी मनाला वेदना देत, समाजातल्या सत्य परिस्थितीची जाणीव करून, माणूस म्हणून आपण कसं जगायला हवं याचं मार्गदर्शन करणारं `उसवण’ हे एक जबरदस्त पुस्तक आहे.

कादंबरीचा शेवट विठूचे दुकान बंद करण्याच्या प्रसंगाने येतो. तिथे असेच एक चमकदार वाक्य येते. ‘आतलं आयुष्य चिंधीसारखं झालंय. धड जपता यिना धड फेकता यिना. अवघा देह मंजी लांबलचक चिंधी झालंय जणू! फाटल्याची परिस्थिती शिवता शिवता थकून गेल्यावानी वाटलंय. सगळ्या जगण्यावर ठिगळ लावलेलं दिसलंय.’ जगण्याचा हा संघर्ष या उसवण कादंबरीत ताकदीने येत जातो.

उसवण
लेखक : देवीदास सौदागर
प्रकाशक : देशमुख अँड कंपनी,पुणे
पृष्ठ : 116 मूल्य : 160 रुपये