
वेगवेगळ्या कथाविषयांच्या चित्रपटांमुळे आणि हटके जोडय़ांमुळे अनेक मराठी चित्रपट सध्या लक्षवेधी ठरतायेत. फतव्याच्या वेगवेगळ्या बातम्या आपण नेहमीच ऐकत असतो, पण आता ‘फतवा’ हे शीर्षक असणारा मराठी चित्रपट येतोय. चित्रपटाचा म्युझिक अनावरण सोहळा नुकताच पार पडला आणि टीझरही प्रदर्शित करण्यात आला.
प्रतीक गौतम आणि श्रद्धा भगत ही नवी जोडी ‘फतवा’मधून पदार्पण करत आहे. छाया कदम, मिलिंद शिंदे, नागेश भोसले, संजय खापरे, अमोल चौधरी, नीलेश वैरागर, पूनम कांबळे, निखिल निकाळजे, निकिता संजय हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ब्ल्यू लाईन फिल्म्स प्रस्तुत आणि प्रतीक गौतम दिग्दर्शित ‘फतवा’ चित्रपट 9 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
प्रेम हा प्रत्येकाच्या मनाचा हळवा कोपरा असतो. कुणी त्यात आकंठ बुडालेला असतो, तर कुणी त्याच्या चाहुलीने मोहरलेला असतो. कुणाला त्याचे चटकेही बसलेले असतात. ‘फतवा’ चित्रपटातून प्रेमाचा वेगळा पैलू उलगडणार असून हा चित्रपट प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करेल असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला.



























































