‘मराठी’च्या प्रमाणपत्रावर हिंदी, इंग्रजीची घुसवाघुसवी! रिक्षा-टॅक्सीचालक भाषा सक्तीची कागदोपत्री बोळवण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी भाषा सक्तीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने रिक्षा-टॅक्सीचालकांना ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध केलेला अभ्यासक्रम गांभीर्याने शिकवला जातोय की भाषा सक्तीची केवळ कागदोपत्री बोळवण केली जातेय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मराठी भाषेच्या प्रमाणपत्रावर हिंदी व इंग्रजीची घुसवाघुसवी केल्याने अभ्यासक्रमाबाबतच संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

परिवहन विभागाने रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी भाषेचे ज्ञान अवगत करण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंतची डेडलाईन दिली आहे. त्यानुसार विविध संस्थांच्या मदतीने रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी भाषेचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जात आहे. उपनगरांतील अनेक रिक्षाचालकांनी ‘मेंटझा’ ऍपद्वारे ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. संबंधित कंपनीकडून पडताळणी झाल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र उपलब्ध करण्यात येत आहे. मूळ अभ्यासक्रम मराठी भाषेचा सन्मान करण्याच्या हेतूने तयार केला असताना ऑनलाइन अभ्यासक्रमाच्या प्रमाणपत्रावर हिंदी आणि इंग्रजी भाषेची घुसवाघुसवी केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे परिवहन विभागाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे. ‘मेंटझा’ ऍपद्वारे ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना खरंच मराठीचे ज्ञान अवगत केले की केवळ परमीट वाचवण्यासाठी हा उद्योग केला असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ऑनलाइन प्रमाणपत्राच्या वैधतेबाबतही संभ्रमावस्था

परिवहन आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत मराठी भाषेचे कार्यज्ञान आत्मसात करण्यासाठी ‘मेंटझा’ ऍपची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार रिक्षाचालकांनी ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण केला. आता ऍपद्वारे मिळवलेले ते प्रमाणपत्र परिवहन विभागाकडून ‘मराठी कार्यज्ञान’ प्रमाणपत्र म्हणून वैध व ग्राह्य धरले जाणार का, याबाबत रिक्षाचालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.