विमानात मराठी भाषेवरून वाद; नोकरीची पर्वा न करता मुंबईकर महिलेने दाखवला यूटय़ूबरला हिसका

एअर इंडियाच्या कोलकात्याहून मुंबईला येणाऱ्या विमानात मराठी भाषेवरून झालेल्या वादाचा व्हिडीओ समोर आला होता. मराठी बोलण्यास नकार देत यूटय़ूबर माही खान याने मुग्धा मजुमदार या महिला प्रवाशाशी वाद घातल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. या प्रकारानंतर माही खान याने अनेक व्हिडीओ बनवून मुग्धा यांची बदनामी केली. त्या मनस्तापातून त्यांना नोकरी सोडावी लागली. दरम्यान, प्रकरण चिघळताच माही खानने संबंधित व्हिडीओ डिलीट करून माफी मागितली आहे.

23 ऑक्टोबर रोजी एअर इंडियाच्या कोलकात्याहून मुंबईला जाणाऱ्या AI 676 या विमानात ही घटना घडली होती. मुग्धा मजुमदार यांनी याबाबत माहिती दिली. विमान प्रवासात चहा पीत असताना पुढच्या सीटवर बसलेल्या माही खानने अचानक सीट मागे घेतली. त्यामुळे त्यांच्या हातातला चहा आणि पुढय़ातील जेवण सांडले. तेव्हा ‘भाऊ, हळू हळू…’ असे मराठीत म्हटल्यावर त्याने माझ्याशी वाद घालायला सुरुवात केली. त्यावर तू मुंबईत राहतो तर तुला मराठी यायलाच हवी, असे मुग्धा यांनी ठणकावले. तरीही मी मराठी बोलणार नाही, अशी मुजोरी त्याने दाखवली. त्यानंतर ‘मुंबईत मराठी आलंच पाहिजे ही कसली मानसिकता,’ अशा प्रकारचा व्हिडीओ त्याने पोस्ट केला व मुग्धा यांची बदनामी केली. मुग्धा या ह्युंदाई कंपनीत नोकरीला होत्या. माही याने त्याचा व्हिडीओ पोस्ट करताना ह्युंदाईलाही टॅग केले होते. त्याचवेळी मुग्धा यांना पह्नवरूनही धमक्या आल्या. या मनस्तापातून त्यांनी तडकाफडकी नोकरीचा राजीनामा दिला. मुग्धा या मूळच्या पश्चिम बंगालमधील असून मुंबईत वास्तव्याला आहेत व मराठी उत्तम बोलतात.

माही खानने मागितली माफी

मुग्धा मजुमदार यांनी ठाण्यात मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांची भेट घेत आपली व्यथा सांगितली. अविनाश जाधव यांनी माही खानला इशारा दिला. त्यानंतर 24 तासांत माही खानने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून माफी मागितली. “तीन दिवसांपूर्वी जो व्हिडीओ टाकला होता, तो मी काढून टाकला आहे. कुणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नव्हता. मी कोणत्याही भाषेविरोधात नाही. माझ्या व्हिडीओमुळे कुणाला वाईट वाटले असेल तर मी माफी मागतो. मुंबई मेरी जान है…जय महाराष्ट्र!’’, असे माही खान याने व्हिडीओत म्हटले आहे.