
सामना ऑनलाईन । मुंबई
देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेमध्ये मराठीनेही आपला झेंडा रोवला आहे. मराठीने तेलगू भाषेला मागे टाकले असून या भाषेने देशात तिसरे स्थान पटकावले आहे. पहिल्या क्रमांकावर हिंदी असून ही भाषा बोलणाऱयांचे प्रमाण ४१.०३ टक्क्यांवरून ४३.६३ टक्क्यांवर पोहोचले आहे, तर बंगाली भाषा दुसऱया स्थानावर आहे.
२०११ मधील जनगणनेच्या आधारे देशातील कोणती भाषा किती बोलली जाते याबाबतची एक यादी तयार करण्यात आली आहे. या यादीनुसार राष्ट्रीय भाषा हिंदी ही मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण२००१ च्या तुलनेत वाढले आहे. तर बंगाली भाषा मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण८.१ टक्क्यांवरून ८.३ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर मराठी भाषा बोलणाऱयांचे प्रमाण २००१ च्या तुलनेत २०११ मध्ये वाढले आहे. २००१ मध्ये मराठी मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण ६.९९ टक्के होते. २०११ मध्ये हे प्रमाण ७.०९ टक्क्यांवर पोहोचले.
महाराष्ट्रात इंग्रजी बोलणारे सर्वाधिक
देशभरातील अडीच लाखांहून अधिक लोकांची मातृभाषा इंग्रजी असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात इंग्रजी भाषा बोलणाऱयांचे प्रमाण सर्वाधिक असून राज्यातील १.०६ लाख लोकांची इंग्रजी ही मातृभाषा आहे. तर इंग्रजी मातृभाषा असलेल्यांच्या यादीत तामिळनाडू दुसऱया स्थानी आहे.
तेलगू बोलणाऱयांचे प्रमाण घटले
तेलगू भाषा बोलणाऱयांचे प्रमाण ७.१९ टक्क्यांवरून ६.९३ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. तर उर्दू सातव्या स्थानावर असून २००१ मध्ये ही भाषा सहाव्या स्थानावर होती. आता गुजराती भाषा सहाव्या स्थानावर आहे.
-देशात केवळ २४ हजार ८२१ लोकांची मातृभाषा ही संस्कृत आहे. संस्कृत भाषा बोडो, मणिपुरी आणि कोकणी भाषेच्याही खाली आहे.

























































