
‘हिंदीसक्ती’वरून महाराष्ट्रात तोंडघशी पडलेल्या भारतीय जनता पक्षाचा जळफळाट झाला आहे. याच नैराश्यातून भाजपने आज मुंबईसह महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या 107 हुतात्म्यांवर गुळणी टाकली. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्राचा व मराठी माणसाचा घोर अपमान केला. ‘महाराष्ट्रात एकही उद्योग नाही. मराठी माणूस दुबे आणि चौबेच्या पैशांवर जगतोय, असे तारे निशिकांत दुबे यांनी तोडले. मराठी माणसाला आपटून आपटून मारू, अशी धमकीही त्यांनी दिली. दुबेंच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे माय मराठीसाठी उभे ठाकले आहेत. महाराष्ट्रात मराठीच, हिंदी सक्ती लादू देणार नाही असे त्यांनी ठणकावले आहे. मराठीच्या एकजुटीपुढे सरकारला माघार घ्यावी लागली. त्यानंतर अभूतपूर्व विजयी सोहळा झाला. त्यामुळे बिथरलेल्या भाजपच्या लोकांनी बेताल बडबड सुरू केली आहे. भाजपचे अभिनेते खासदार दिनेश लाल यादव यांच्यानंतर आज झारखंडचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्राविरोधात फुत्कार सोडले.
हिंमत असेल तर यूपी, बिहारमध्ये या!
‘महाराष्ट्रात बसून तुम्ही बॉसगिरी करताय. एवढंच वाटत असेल तर उत्तर प्रदेश, बिहार आणि तामिळनाडूत या. तुम्हाला आपटून आपटून मारू, अशी धमकीची भाषाही दुबे यांनी केली.
दुबेंच्या तोंडी भाजपचा अजेंडा- काँग्रेस
दुबे यांनी मराठी हिंदी वादावर केलेले विधान अत्यंत आक्षेपार्ह व निषेधार्ह आहे. दुबेंच्या वक्तव्यावरून भारतीय जनता पक्षाला मराठी-हिंदी वाद निर्माण करून वाढवायचा आहे हे स्पष्ट दिसत आहे. मराठी हिंदी हा भाषिक वाद निर्माण करून त्याला भारत पाकिस्तान वादासारखा शत्रुत्वाचा रंग देण्याचा हा प्रयत्न देशभरातील भाजप नेत्यांकडून सुरु आहे. भाषिक आणि प्रांतिक वाद निर्माण करण्याचा हाच अजेंडा भाजप निशिकांत दुबेंच्या तोंडून पुढे रेटत आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
तुमच्याकडे एकही उद्योग नाही
‘महाराष्ट्रात आहे काय? कोणता उद्योग आहे तुमच्याकडे? टाटा, बिर्ला, रिलायन्स कोणत्या कंपनीचे कारखाने तुमच्याकडे आहेत? टाटाने पहिली फॅक्टरी बिहारमध्ये बनवली. खाणी आमच्याकडे आहेत. झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशाकडे आहेत. महाराष्ट्रात कुठल्या खाणी आहेत, रिलायन्सने रिफायनरी गुजरातमध्ये टाकलीय. सेमीकंडक्टरचा उद्योग गुजरातमध्ये येतोय. तुमच्याकडे काय आहे? आमच्या पैशावर जगताय, आमच्या भाकरी खाताय, आमचे शोषण करून टॅक्स देताय आणि वर आमच्यावरच दंडेली करताय, अशी मुक्ताफळे दुबेंनी उधळली.
महाराष्ट्रद्वेष हाच भाजपचा खरा डीएनए
दुबेसारखे थर्ड क्लास लोक हिंदी भाषिकांचे नव्हे भाजपचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या विधानातून भाजपचा महाराष्ट्राबद्दलचा द्वेष स्पष्ट होतो, हाच भाजपचा खरा डीएनए आहे, अशी तोफ शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी डागली. महाराष्ट्रात पूर्ण देशातील लोक गुण्यागोविंदाने राहतात. कोविड काळात त्यांना तुम्हीसुद्धा आमचेच आहात म्हणत आधार देणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, अशी आठवणही आदित्य यांनी करून दिली.