
मराठी लोक कुणाची भाकरी खातात, मराठी लोक कर भरत नाहीत असे विधान भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केले आहे. तसेच मराठी लोक आमच्या पैश्यांवर जगतात असे म्हणत दुबे बरळले आहेत.
भाजप खासदार निशिकांत दुबे म्हणाले की, मराठी माणसं कुणाची भाकरी खातात? तिथे टाटा आहे बिर्ला आहे, रिलायन्स आहे. या सगळ्यांच्या कंपन्या महाराष्ट्रात नाही. टाटांनी पहिला कारखाना बिहारमध्ये काढला होता. मराठी लोक आमच्या पैश्यांवर जगतात. मराठी लोक कुठला कर भरतात? महाराष्ट्राकडे कुठले उद्योग आहेत? झारखंड, छ्त्तीसगड आणि मध्य प्रदेशकडे खाणी आहेत. महाराष्ट्रात कुठल्या खाणी आहेत. रिलायन्स कंपनीनेही गुजरातमध्ये रिफायनरी फॅक्टरी लावली आहे. सर्व सेमी कंडक्टरचे उद्योग गुजरातमध्ये जात आहेत. जर तुमच्यात हिंमत असेल तर उर्दू भाषिकांनाही मारून दाखवा. तमिळ, तेलुगू भाषिकांनाही मारा. जर तुमच्यात हिंमत असेल तर उत्तर प्रदेश, बिहार आणि तमिळनाडूमध्ये या तुम्हा उचलून आपटतील. हा अराजकपणा चालणार नाही. तसेच आम्ही मराठी भाषेचा आदर करतो. छत्रपती शिवाजी महाराज, पेशव्यांपासून ते तात्या टोपेंपर्यंत आम्ही सगळ्यांचा आदर करतो. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. पण आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे व्होट बँकेचे राजकारण सुरू आहे असेही दुबे म्हणाले.