
कोरोना संकटात आॉनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून धडे गिरवणारे मराठी शाळांमधील विद्यार्थी सध्या मोबाईलमधील मराठी टायपिंगचे धडे गिरवत आहेत. ’गुगल व्हॉईस टायपिंग’मधील ’डिक्टेशन टूल’चा वापर करुन विद्यार्थी मराठीत बोलतात आणि गुगल ते टेक्स्टमध्ये रुपांतरीत करते. शीव येथील शीव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलने पुढाकार घेत टेस्टमाँझ आणि गुगल व्हॉईस टायपिंग ची यासाठी मदत घेतली आहे.
अनेक शाळा झूम ऍप किंवा गुगल मीटच्या माध्यमातून आँनलाईन शाळा घेत आहेत. या माध्यमातून व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणे शक्य असले तरी विद्यार्थ्यांना व्हिडिओद्वारे शिककल्या गेलेल्या विषयाचे नेमके किती आकलन झाले, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. ’ई-लर्निंगचा अवलंब करताना शिक्षक जे विद्यार्थ्यांना शिकवतायत, ते विद्यार्थ्यांना खरंच समजतंय का, किती प्रमाणात त्यांचं आकलन आहे, त्यांना पुन्हा पुन्हा तेच विषय शिकवावे लागतील का, असे अनेक प्रश्न पडले होते. पण टेस्टमॉझ आणि गुगल व्हॉईस टायपिंग या ऍपच्या सहकार्याने आम्ही त्यावर उत्तर शोधले’ असे डी. एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी सांगितले.
डी. एस. हायस्कूलचे गणित-विज्ञानाचे शिक्षक डॉ. संजय मोहिते म्हणाले, ’टेस्टमॉझ ’च्या सहाय्याने शाळेतील शिक्षकांनी लहान-लहान प्रश्नपत्रिका बनवल्या. व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना 40 मिनिटे शिकवल्यावर शिक्षक त्यांना वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक प्रश्न सोडवायला देतात. जर विद्यार्थ्यांचा स्कोअर चांगला आला, तर त्यांना त्या विषयाचे आकलन झाले हे शिक्षकांना समजते.’

























































