मराठी प्रेक्षक वाढले, जाहिरातींचे मार्केट काबीज करण्यासाठी नेटवर्क्समध्ये चढाओढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

महाराष्ट्रात वर्षानुवर्षे मराठी प्रेक्षकांवर असलेला हिंदी मालिकांचा प्रभाव आता हळूहळू ओसरताना दिसतोय. फिक्कीच्या 2017 च्या अहवालानुसार, महाराष्ट्र आणि गोव्यात टीव्हीवर मराठी मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येत तब्बल 74 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मराठी मनोरंजन वाहिन्यांना वर्षाकाठी जाहिरातींमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा आकडा तब्बल 800 ते हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे हजार कोटींचे हे मार्केट काबीज करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील बड्या नेटवर्क्समध्ये सध्या चढाओढ पाहायला मिळतेय. तामीळनाडूतील ‘सन टीव्ही’ देखील आता मराठीच्या प्रेमात पडलेली दिसत आहे. सन टीव्हीही मराठी प्रादेशिक वाहिनी सुरू करण्याच्या तयारीत आहे.

फिक्की 2017 च्या आकडेवारीनुसार, छोटय़ा पडद्यावर मालिका पाहणाऱया प्रेक्षकांची संख्या 74 टक्क्यांनी वाढली आहे. सन टीव्हीनेदेखील मराठी वाहिनी सुरू केल्यास महाराष्ट्र हे पाच बडय़ा नेटवर्क कंपन्या असलेले एकमेव राज्य ठरेल. सध्या महाराष्ट्रात झी, सोनी, व्हायकॉम 18 आणि स्टार इंडिया हे चार बडे नेटवर्क्स आहेत.

मराठी मनोरंजन वाहिन्यांवर दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींवर वर्षाकाठी 800 ते 1000 कोटी रुपये खर्च केले जातात. 2 कोटी 37 लाख घरांमध्ये दर आठवडय़ाला 1400 मिनिटे वेळ प्रेक्षक टीव्ही बघतात. ही आमच्यासाठी सुवर्णसंधी आहे.
-अजय भाळवणकर, बिझनेस हेड, सोनी मराठी

summary- marathi-tv-audience-increased