
सामना प्रतिनिधी, नाशिक
नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे समाजातील गरजू घटकांना मदत व्हावी, या उद्देशाने आयोजित 17व्या नाशिक रनमध्ये आज तब्बल पंधरा हजार नागरिक धावले. सकाळच्या कडाक्याच्या थंडीतही आबालवृद्ध नाशिककरांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.
महात्मानगर मैदानावर सकाळी सहापासूनच नाशिककर जमण्यास सुरुवात झाली होती. नाशिक रनचे अध्यक्ष एच. एस. बॅनर्जी, उपाध्यक्ष एच. बी. थोन्टेश, सचिव अनिल दैठणकर, खजिनदार राजाराम कासार, विश्वस्त प्रबळ रे, बॉशचे व्यवस्थापकीय संचालक सौमित्र भट्टाचार्य, टीडीकेचे एन. बालाकृष्णन, बॉशचे सहसंचालक अँड्रेस ओल्फ, जॉन ओलिवर, श्रीनिवासन, ए. कृष्णा, टीडीकेचे उपाध्यक्ष जेम्स कशल आदी मान्यवर उपस्थित होते, त्यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडण्यात आले. खेळाडू स्वयम् पाटील याच्या हस्ते ध्वजारोहण झाले, तर आंतरराष्ट्रीय धावपटू पूनम सोनुने, अभिजीत हिरकुड, किसन तडवी यांनी नाशिक रनची मशाल क्रीडांगणावरून व्यासपीठावर आणत क्रीडाज्योत प्रज्वलित केली.
त्यानंतर पुढील वर्षाच्या आयोजनाची सूत्रे टीडीके इंडिया कंपनीकडून बॉशकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी ग्रामीण भागातील 40 गरजू विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी सायकलचे वाटप करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही नाशिक रन उपक्रमातून जमा झालेल्या निधीचा अतिदुर्गम भागात सुविधा पुरविणे, गोरगरीब मुलांचे शिक्षण, क्रीडापटूंसाठी सुविधा, आरोग्य व्यवस्था आणि दिव्यांगांना मदतीकरिता वापर केला जाणार आहे.
थक्क करणारा उत्साह
प्रथम विशेष मुलांच्या रनला सुरुवात झाली. त्यांचा उत्साह उपस्थितांना थक्क करणारा होता. त्यानंतर लहान मुले व पुढील वयोगटातील नागरिकांची रन पार पडली. महात्मानगर मैदान, पारिजातनगर, जेहान सर्कल, आयसीआयसीआय एटीएममार्गे पुन्हा मैदान असा हा मार्ग होता. या मार्गावर पन्नासहून अधिक स्वयंसेवक तैनात होते. पिण्याचे पाणी, तसेच सातहून अधिक वैद्यकीय सेवा केंद्रांचीही व्यवस्था करण्यात आली होती.





























































