नगरमध्ये आरोग्याचा जागर; मॅक्सिमस नगर रायझिंग हाफ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘हम फिट तो नगर फिट’ असा नारा देत पहाटे कडाक्याच्या थंडीत सुमारे साडेतीन हजार स्पर्धक मॅक्सिमस नगर रायझिंग हाफ मॅरेथॉनमध्ये धावले. समाजाला आरोग्याप्रती व कॅन्सर विषयक जागृती करण्यासाठी नगर रायझिंग फाऊंडेशन आयोजित व महाराष्ट्र अ‍ॅथेलेटिक असोसिएशनच्या मान्यतेने या हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रविवार असूनही भुईकोट किल्ल्याजवळील नगर क्लब पहाटेच गर्दीने हाऊसफुल्ल झाले होते. गुलाबी थंडीत उत्साहाची उब घेवून धावणारे महिला, पुरुष, युवक-युवतींसह लहान मुले, सोनेरी सुर्यकिरणांचा वर्षाव असे मनोहारी दृष्य या मॅरेथॉन निमित्त पहायला मिळाले. अतिशय शिस्तबध्दरित्या आणि तितक्याच उत्साहात संपूर्ण मॅरेथॉन पार पडली. 21 कि.मी., 10 कि.मी. तसेच 3 व 5 कि.मी.या चार गटात ही स्पर्धा झाली.

ऑलंम्पिक खेळाडू ललीता बाबर, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, प्र.पोलीस अधिक्षक सागर पाटील, कॅन्टोमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार, छायाताई फिरोदिया, आशाताई फिरोदिया, रेखा सारडा, नगर रायझिंग फाऊंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, स्पर्धा संयोजक संदीप जोशी, डॉ. सतीश सोनवणे, डॉ.शाम तारडे, अ‍ॅड.गौरव मिरीकर, अ‍ॅथेलिटिक्स असो.चे दिनेश भालेराव, मनपा नगर रचनाकार राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झेंडा दाखवून चार गटातील मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. झुंबा डान्सची धमाल रनर्सनी अनुभवली. तर आर्मीच्या बॅण्ड पथकासह विविध प्रेरक हिंदी गीतांनी रनर्सचा उत्साह वाढवला. मॅरेथॉनच्या सुरवातीला नगर रायझिंगचे गीत वाजविण्यात आले. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी काही महिला चक्क नऊवारी साडी परिधान करुन या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्या होत्या. तिरंगा ध्वज घेऊन एकात्मतेचा संदेश देण्यासाठी आलेले रनर्स या मॅरेथॉनचे आकर्षण ठरले. जगातील अतीशय खडतर मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारे रनर्स चंद्रकांत पाटील, मनोज देशपांडे, तुकाराम नाईक, सुरेंद्र ब्रम्हे, जस्मीत वधवा, चेतन नवलानी, मीना पोटे पेसर हेदेखील स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेच्या समारोपनंतर नगर क्लबच्या मैदानावर लगेचच ऑलंम्पिक खेळाडू ललीता बाबरच्या हस्ते रनर्सना बक्षिस देण्यात आले. यामध्ये 21 कि.मी. पुरुष गटामध्ये प्रथम- चांगदेव लाटे (नगर), समित भूकेर (बीटीआर), कार्तिक कुमार (बीटीआर), महिला मध्ये प्रथम- स्मिता उकिर्डे, द्वितीय- भारती यादव, तृतीय- अनिता बोथरा (तिन्ही रा. नगर), तर 10 कि.मी. पुरुष गटात प्रथम- किशोर मरकड (पाथर्डी), द्वितीय- महेंद्र कुमार, तृतीय- विशाल ढगे, महिलांमध्ये प्रथम- जनाबाई हिरवे (सातारा), द्वितीय- शितल भंडारी (पारनेर), तृतीय- नेहा खान (नगर) यांनी बक्षिसे पटकाविली. स्पर्धेचा अंतिम व संपुर्ण निकाल 15 दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे.

स्पर्धेचे मुख्य संयोजक नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, नगरमध्ये क्रीडा संस्कृती वाढीस लागावी, प्रत्येकाने आरोग्याप्रती जागृत रहावे या उद्देशाने पाच वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय पातळीवरील मॅरेथॉनच्या धर्तीवर नगरमध्ये मॅक्सिमस नगर रायझिंग हाफ मॅरेथॉनची मुहूर्तमेढ रोवली होती. यंदा या सलग सहाव्या वर्षी नगरकरांनी या स्पर्धेला अभूतपूर्व असा प्रतिसाद दिला. आरोग्याप्रती जनजागृतीचे काम फाऊंडेशनने घेतले असून, या चळवळीला नगरकर स्वयंफुर्तीने सहकार्य करीत असल्याचे सांगून, पुढील 2021 ची सातव्या सिझनची हाफ मॅरेथॉन 7 फेब्रुवारी होणार असल्याचे जाहीर केले. ललिता बाबर म्हणाल्या की, अशा मॅरेथॉन मधूनच मी घडले आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नगर रायझिंग फाऊंडेशन घेत असलेले उपक्रम प्रेरणादायी आहे. शरीर हीच धनसंपत्ती असून त्याची काळजी घेण्यासाठी दररोज व्यायाम व धावणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमदार संग्राम जगताप यांनी मॅरेथॉन स्पर्धेस भेट देऊन विजेत्या व सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा देऊन आरोग्याप्रती जागृक राहण्याचे आवाहन केले.

यावेळी स्पर्धेतील रनर्सच्या चेस्ट नंबच्या आधारे लकी ड्रॉ काढण्यात आले. यामध्ये भाग्यवान विजेते ज्योतीराज शिंदे, उमेश व्यवहारे, ज्ञानेश्‍वर मोरे, ओम ढवळे, दिपा मोहळे, महेश घोडके, नवीन कुमार, जितेंद्र मराठे यांना सायकल बक्षिस देण्यात आले. पोलिस दल, स्वयंसेवकांची फळी आणि नगरकरांचा प्रतिसाद यामुळे संपूर्ण स्पर्धेतून शिस्तीचे दर्शन घडले. आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या धर्तीवरील या हाफ मॅरेथॉनसाठी सर्व अत्याधुनिक तांत्रिक सुविधा देण्यात आल्या होत्या. प्रत्येकाने नगर रायझिंगच्या टिमचे आभार मानत एका चांगल्या उपक्रमात सहभागी होता आल्याचा आनंद व्यक्त केला.