मराठवाड्याला मागासलेपणापासून मुक्त करायचे आहे- मुख्यमंत्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
marathwada-mukti-din-speech

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

मराठवाड्यावर मागासलेपणाचा लागलेला शिक्का पुसून टाकायचा आहे. मागासलेपणापासून मुक्ती देत समृद्धी आणि विकास दयायचा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठवाडा मुक्ती संग्रामदिनानिमित्त सिद्धार्थ उद्यानातील स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून देवेंद्र फडणवीस यांनी मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना मानवंदना दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले.

या वेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले निजाम राजवटीमध्ये रझाकारांच्या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात मराठवाड्यातील नागरिकांनी लढा उभारला. या लढयाचे नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. सैनिकी कारवाईमुळे निजामाने मराठवाडा मुक्त केला. आता मराठवाड्याला विकासाची भूक लागली आहे.

मराठवाड्याच्या विकासासाठी वेगवेगळे निर्णय घेण्यात आले. सिंचन, हक्काचे पाणी, बळीराजा संजिवनी योजना, जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून ६० हजार हेक्टर क्षेत्रावर संरक्षक सिंचन करण्यात आले. जंगल कमी झाल्यामुळे निसर्गाच्या प्रकोपाला सामोरे जावे लागत आहे. मराठवाड्यात ५ कोटी वृक्ष लागवड झाल्यामुळे भविष्यात दुष्काळमुक्तीचे पाऊल ठरेल, असेही ते म्हणाले. उद्योगात संभाजीनगर-जालना मॅगनेट ठरणार असून डीएमआयसीच्या ऑरिकसिटीत ११ हजार कोटीची गुंतवणूक होवून ३ लाख रोजगार निर्मिती होणार आहे, असेही ते म्हणाले. मराठवाडा व विदर्भातील उद्योग वाढीसाठी वीजेचे दर कमी केले. मराठवाड्यात सर्वात मोठी वॉटरग्रीड तयार करून १४ प्रकल्पांचे पाणी एकत्रित करून पाईपलाईनद्वारे पिण्यासाठी दिले जाणार आहे. जागतिक दर्जाचे शहर बनविण्यासाठी प्रयत्नशील असून मराठवाड्याला मागासलेपणापासून मुक्ती करून समृद्धी व विकास द्यायचा आहे, असं त्यांनी भाषणात सांगितलं.

दरम्यान, या कार्यक्रमास राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते, शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे, जि. प. अध्यक्षा अ‍ॅड. देवयानी डोणगावकर, महापौर नंदकुमार घोडेले, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, आमदार सतीष चव्हाण, अतुल सावे, भाऊसाहेब चिकटगावकर, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, विभागीय आयुक्त डॉ. पुरषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलीस अधिक्षक आरती सिंग, जि. प. च्या मुख्यकार्यकारी अधिकारी परनिती कौर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रविणा कन्नडकर, सोनार यांनी केले.