आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

हैदराबादच्या निजामाच्या जोखडातून मुक्त होत स्वतंत्र हिंदुस्थानात सामील होण्यासाठी संस्थानातील स्वातंत्र्यसैनिकांनी लढा देऊन मिळवलेल्या स्वातंत्र्याला उद्या 17 सप्टेंबर रोजी 74 वर्षे पूर्ण होत आहेत. या मुक्तिसंग्रामाच्या लढय़ाला उजाळा देतानाच त्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या स्वतः संभाजीनगर येथे उपस्थित राहणार आहेत. सिद्धार्थ उद्यानातील मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन स्मृतिस्तंभाजवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी 9 वाजता ध्वजारोहण करतील.

आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन मराठवाडय़ातील आठही जिह्यांत उत्साहाने साजरा केला जातो. या दिनानिमित्ताने संभाजीनगर येथे जय्यत तयारी सुरू आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मराठवाडय़ाची मुख्य प्रशासकीय इमारत अर्थात विभागीय आयुक्तालयावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालक मंत्री सुभाष देसाई स्वतः उपस्थित राहून स्मृतिस्तंभाजवळ ध्वजारोहण करतील. ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री मराठवाडय़ातील नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शहरातील इतर नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहतील. शहरातील जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन करतील तसेच पैठण येथील संतपीठाच्या उद्घाटनाची घोषणा करतील.

शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निमंत्रितांनी या कार्यक्रमास राष्ट्रीय पोषाखात सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमात सामाजिक अंतरासंदर्भातील सर्व नियम पाळून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुक्तिसंग्राम दिनाचा इतिहास दर्शवणारे फलक

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनासाठी संभाजीनगर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धार्थ उद्यान सज्ज झाले आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मृतिस्तंभ परिसरातील भिंतीवर मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास दर्शवणारे फलक लावण्यात आले आहेत. या फलकांच्या माध्यमातून इतिहासाला उजाळा देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या