मराठवाडय़ातील पाणीपातळी वाढली

453

मराठवाडा विभागावर परतीच्या पावसाची कृपा झाली आहे.  अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे विभागातील 76 पैकी 34 तालुक्यांतील भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. पाणीपातळीत वाढ झालेल्या नांदेड जिल्हय़ातील सर्वाधिक 16 तालुक्यांचा यात समावेश आहे.

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत भूजल पातळीची नोंद घेतली जात़े विभागातील 875 निरीक्षण विहिरींच्या माध्यमातून यंदाच्या पावसाळी हंगामात भूगर्भातील पाणीपातळीत घट किंवा वाढ झाली आहे याची नोंद केली जाते. ऑक्टोबर महिन्यात घेण्यात आलेल्या नोंदणीनुसार मराठवाडय़ातील 34 तालुक्यांतील पाणीपातळीत वाढ झाली आहे अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

मराठवाडय़ातील भूजल पातळीत वाढ झालेल्या 34 तालुक्यांत संभाजीनगर , जालना जिल्हय़ातील अनुक्रमे सोयगाव, भोकरदन या दोन तालुक्यांचा समावेश आहे. परभणी जिल्हय़ातील परभणी, पाथरी, पूर्णा, पालम, मानवत, गंगाखेड, सोनपेठ आणि सेलू या आठ तालुक्यांतील भूजल पातळीत वाढ झाली आहे. सर्वाधिक भूजल पातळीत वाढ झालेल्या तालुक्यात नांदेड जिल्हय़ातील सोळा तालुक्यांचा समावेश आह़े  यामध्ये नांदेड, मुदखेड, अर्धापूर, भोकर, उमरी, कंधार, लोहा, किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर, देगलूर, बिलोली, नायगाव, धर्माबाद आणि मुखेड या तालुक्यांचा समावेश आहे.

भूजल पातळीत वाढ झालेल्या तालुक्यांत हिंगोली जिल्हय़ातील हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ आणि सेनगाव या पाच तालुक्यांचा समावेश असून बीडमधील गेवराई, माजलगाव आणि परळी या तीन तालुक्यांतील भूजल पातळीत परतीच्या पावसाने वाढ झालेली आहे. वाढलेली भूजल पातळी ही त्या त्या भागातील शेतकऱयांना दिलासा देणारी आहे.

धाराशीव, लातूरमध्ये वाढ नाही

अतिवृष्टी, परतीच्या जोरदार पावसानंतरही धाराशीव आणि लातूर जिल्य़ातील भूगर्भातील पाणीपातळीत वाढ होऊ शकलेली नाही. उलट धाराशीव जिल्हय़ातील धाराशीव, उमरगा, लोहारा, वाशी, भूम आणि परंडा या सहा तालुक्यांत तीन मीटरची घट आहे.  लातूर जिल्हय़ातील लातूर, रेणापूर, अहमदपूर आणि जळकोट या चार तालुक्यांत 1-2 मीटरची घट आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या