नासाचे ड्रोन मंगळावर उडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेची अंतराळ संस्था नासा येत्या एप्रिल महिन्यात मंगळावर ड्रोन उडवणार आहे. परसिव्हिरन्स रोव्हरच्या मदतीने हा ड्रोन मंगळावर आधीच पाठवण्यात आलेला आहे. त्याचे नाव ‘इंजेन्युटी’ असून तो 1.8 किलो वजनाचा आहे. मंगळावरील जीवसृष्टीचा शोध घेताना ड्रोनची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

मंगळावर ड्रोन उडवण्याची घटना म्हणजे 1903 साली राईट बंधूंनी उडवलेल्या पहिल्या विमानासारखी असेल. म्हणूनच नासाने हा क्षण संस्मरणीय करण्यासाठी राईट बंधूंच्या पोशाखासारखा स्टॅम्प ड्रोनवर चिकटवलेला आहे. सध्या हा ‘इंजेन्युटी’ ड्रोन रोव्हरला जोडलेला आहे. लवकरच तो रोव्हरपासून वेगळा केला जाईल.

मंगळावर जेजर क्रेटरच्या जवळ 10 मीटरची एक जागा आहे. त्याला एअरफिल्ड म्हणतात. त्या जागेत ड्रोन पाचवेळा उडणार आहे. त्याच्या प्रत्येक हालचालीचे रेकॉर्डिंग केले जाणार आहे. फोटो आणि व्हिडीओ घेतले जाणार आहेत.

‘इंजेन्युटी’ ड्रोनमध्ये चार कार्बन फायबर ब्लेड्स आहेत. प्रत्येक ब्लेडचा वेग 2400 आरपीएम आहे. पृथ्वीवरील हेलिकॉप्टरच्या वेगापेक्षा या ब्लेड्सचा वेग जास्त आहे.