मारुती सुझुकीचा प्रवास उतरणीलाच, सप्टेंबरमध्ये उत्पादन 17.48 टक्क्यांनी घटले

625

 आर्थिक मंदीचे ग्रहण लागलेल्या वाहन क्षेत्रातील एकामागून एक कंपन्या डबघाईला येत आहेत. कार उत्पादनाच्या बाबतीत देशात सर्वात मोठी कंपनी असलेल्या मारुती सुझुकीलाही उतरती कळा लागली असून सप्टेंबरमध्ये कंपनीचे कार उत्पादन तब्बल 17.48 टक्क्यांनी घटले. त्यामुळे मागणी असेल तरच उत्पादन करण्याचा निर्णय कंपनीला घ्यावा लागला आहे.

आर्थिक मंदीचा वाहन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. अवजड वाहने तसेच ऑटोपार्टचे उत्पादन करणाऱया कंपन्यादेखील या मंदीच्या जबडय़ातून सुटलेल्या नाहीत. मारुती सुझुकी इंडिया, ह्युंदाई, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, होंडा आणि टाटा मोटर्स यांसारख्या नामांकित कंपन्यांचीही चाके मंदीच्या संकटात रुतली आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 1 लाख 60 हजार 219 गाडय़ांचे उत्पादन करणाऱया मारुती सुझुकीने यंदाच्या सप्टेंबरमध्ये 1 लाख 32 हजार 199 गाडय़ांची निर्मिती केली. ही उतरती कळा ऑगस्टमध्येही प्रकर्षाने दिसली. या महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 33.99 टक्क्यांनी कमी म्हणजेच 1 लाख 11 हजार 370 गाडय़ांचे उत्पादन करण्यात आले. सप्टेंबरमध्ये तर दोन दिवस (7 आणि 9 तारखेला) गुडगाव आणि मनेसर येथील कारखान्यांतील काम बंद ठेवण्यात आले होते. निर्मिती केलेल्या गाडय़ा खरेदी करण्यास अपेक्षित ग्राहक पुढे येत नसल्यामुळे कंपनीची घोर निराशा झाली आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी कंपनीकडून आकर्षक सवलतींचा वर्षावही केला जात आहे.

नॅनोचा लवकरच ‘टाटा’

सर्वसामान्य लोकांचे गाडी घेण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी टाटा मोटर्सने अवघ्या एक लाखात आणलेली नॅनो कार लवकरच इतिहासजमा होणार आहे. यंदाच्या 9 महिन्यात केवळ एकाच नॅनोची विक्री झाली असून नव्या नॅनोची निर्मितीही झालेली नाही. त्यामुळे टाटा मोटर्सने नॅनोला टाटा करण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल 2020 पर्यंत नॅनोचे उत्पादन पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर आहे.

नॅनोमध्ये सुरक्षा नियमांनुसार बदल करण्यासाठी गुंतवणूक करण्यास टाटा मोटर्स उत्सुक नाही. जानेवारी 2008 मध्ये दिल्लीमध्ये पार पडलेल्या ऑटो एक्सपोमध्ये टाटाने सामान्य लोकांसाठी अवघ्या एक लाखात नॅनो कार बाजारात आणली. मात्र ही गाडी बाजारात तग धरू शकली नाही. नॅनोच्या विक्रीत प्रत्येकवर्षी घट होत आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या