कार खरेदी सुसाट… मारुती सुझुकीने एका दिवसात 50 हजार गाड्या विकल्या

धनत्रयोदशीच्या दिवशी कार मार्केटमध्ये मोठी उलाढाल झाली. जीएसटी कपातीनंतर दुसऱयांदा धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर लोकांनी मोठय़ा प्रमाणावर कार खरेदीचा उत्साह दाखवला. देशातील प्रमुख ऑटो कंपन्यांच्या विक्रीने विक्रमी आकडेवारी गाठली. देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाने तर एकाच दिवसात 50 हजारांहून अधिक युनिट्सची विक्री करण्याचा टप्पा ओलांडला.

मारुती सुझुकीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी (मार्केटिंग आणि विक्री) पार्थो बनर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी (शनिवार) सायंकाळपर्यंत कंपनीने 38,500 युनिट्सची डिलिव्हरी केली होती. रात्रीपर्यंत हा आकडा 41 हजारांच्या आसपास पोहोचला. धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त रविवार दुपारपर्यंत होता. त्यामुळे रविवारी दुपारपर्यंत उर्वरित 10 हजार ग्राहकांना गाडय़ांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.

  • गेल्या वर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी मारुतीने 41,500 युनिट्सची विक्री केली होती. या वर्षी हा आकडा 50 हजारांच्या पुढे गेला आहे.
  • सणासुदीच्या बुकिंगमध्ये वाढ ः कंपनीला नवरात्रीपासून दररोज सरासरी 14 हजार बुकिंग्स मिळत आहेत. 18 सप्टेंबरपासून किमती कमी केल्यानंतर (GST 2.0 मुळे) कंपनीने आतापर्यंत 4.5 लाख बुकिंग्सची नोंद केली आहे, ज्यात लहान कारसाठी 94 हजारांहून अधिक बुकिंग्सचा समावेश आहे.

ह्युंदाईची दमदार कामगिरी

मारुती सुझुकीप्रमाणेच ह्युंदाई मोटर इंडियानेदेखील या धनत्रयोदशीला जोरदार विक्रीची नोंद केली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण गर्ग यांनी सांगितले की, या धनत्रयोदशीला कंपनीने 14 हजार युनिट्सची डिलिव्हरी करण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ही आकडेवारी कंपनीसाठी एक नवीन विक्रम ठरू शकते. एकंदरीत या धनत्रयोदशीच्या खरेदीमुळे ऑटो उद्योगात उत्सवाचा उत्साह आणि बाजारात ग्राहकांचा सकारात्मक दृष्टिकोन स्पष्टपणे दिसून येत आहे.