
रविवारी समुद्रात पोहायला जाणे अल्पवयीन मुलांच्या अंगाशी आले. मालाडच्या मार्वे बीचवर सकाळी पोहायला गेलेले पाच मित्र बुडाले. सुदैवाने काही पर्यटकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी पुढाकार घेत मुलांना वाचवण्यासाठी धाव घेतली. यात दोघा मुलांना वाचवण्यात यश आले. मात्र तिघे खोल पाण्यात खेचले गेले. या तिघांचा नौदलाचे तीन पाणबुडे, तटरक्षक दल आणि अग्निशमन दलाकडून रात्री उशिरापर्यंत शोध घेतला जात होता.
सकाळी सुमारे साडेनऊ वाजता पाच मित्र समुद्र किनाऱयापासून अर्धा किलोमीटर आत समुद्रात गेली. मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडाली. किनाऱयावरील लोकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी कुरशाना हरिजन (16) आणि अंकुश शिवरे (13) या दोघांना सुखरूप बाहेर काढले. मात्र त्यांच्याबरोबर पोहायला गेलेले शुभम जयस्वाल (12), निखिल कायामुकूर (13) आणि अजय हरिजन (12) हे तिघे खोल पाण्यात खेचले गेले. त्यांचा शोध अजूनही लागलेला नाही.
पावसात समुद्रात उतरणे धोकादायक
समुद्र किनारी, चौपाटय़ांवर विशेष करून पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र पावसाच्या दिवसांत समुद्रात उसळणाऱया उंच लाटा धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे समुद्रात जाऊ नये, असे आवाहन पालिका वारंवार करत असते. तसे फलक चौपाटय़ांवर जागोजागी लावले जातात तर धोकादायक चौपाटय़ांवर महापालिकेच्यावतीने जीवरक्षक नेमले जातात. स्थानिक पोलीसही या धोक्याबाबत सूचना देत असतात. तरीही काही अतिउत्साही मंडळी खोल पाण्यात उतरतात आणि जीव गमावून बसतात.
रात्री उशिरापर्यंत शोध सुरू
खोल पाण्यात खेचल्या गेलेल्या शुभम जयस्वाल (12), निखिल कायामुकूर (13) व अजय हरिजन (12) या तिघा बेपत्ता मुलांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. नौदलाची युद्धनौका असलेल्या हमलाचे तीन पाणबुडे, तटरक्षक दल, अग्निशमन दल आणि पोलिसांकडून या तिघा मुलांची शोधमोहीम सुरू होती.




























































