‘मास्क कारवाई’ रद्द झाली तरी मुंबईकरांना ‘जबाबदारी’चे भान!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 मुंबईसह राज्यभरात कोरोना पूर्ण आटोक्यात आल्यामुळे सर्व निर्बंध शिथिल करून मास्कशिवाय फिरणाऱयांना होणारा 200 रुपयांचा दंड रद्द केला तरी बहुतांशी मुंबईकर मात्र अजूनही ‘मास्क’चा वापर करीत आहेत. भविष्यात कोरोनाचा धोका निर्माण होऊ नये यासाठी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर राखणे आणि कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. याची ‘जबाबदार’ मुंबईकर अंमलबजावणी करीत आहेत.

कोरोनाचा प्रभाव वाढत असताना नाकातोंडावर मास्क वापरल्यास कोरोनाची लागण मोठय़ा प्रमाणात टाळता येईल, असे निर्देश जागतिक आरोग्य संघटनेने दिल्याने मुंबई मार्च 2020 पासून सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले. यामध्ये मास्कशिवाय फिरणाऱयांवर कारवाई करण्यासाठी क्लीन अप मार्शलची नेमणूक करण्यात आली. याशिवाय पोलिसांनाही कारवाईचे अधिकार देण्यात आले. तसेच रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत 31 मार्चपर्यंत 46 लाख 21 हजार 725 जणांवर कारवाई करून तब्बल 91 कोटी 91 लाख 79 हजार 075 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

पालिकेच्या कारवाईत सर्वाधिक दंड वसूल

 मास्क कारवाईत पालिकेने सर्वाधिक 36 लाख 82 हजार 013 जणांवर कारवाई करून सर्वाधिक 73 कोटी 12 लाख 36 हजार 675 रुपयांचा दंड वसूल केला. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर एकूण 23 हजार 891 जणांवर कारवाई करून 47 लाख 78 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईत 9 लाख 15 हजार 821 जणांवर कारवाई करून 18 कोटी 31 लाख 64 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.