मास्क आणि मेकअप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. अप्रतिम गोयल (सौंदर्यतज्ञ)

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात लॉकडाऊनप्रमाणे मास्कचे बंधनही काही दिवस किंवा महिन्यांपुरते मर्यादित वाटले होते. पण आता मास्क हा जणू शरीराचा अविभाज्य भाग झाला आहे. मग आपल्या आवडत्या पावडर… लाली… लिपस्टीकचे काय…?

कोरोना या विषाणूपासून बचाव करण्यासाठी मास्क आता आपल्या चेहऱयावर कायमचेच असणार आहेत. त्यात सगळ्या महिलांना आवडणारी लिपस्टिक मास्कमुळे दिसेनाशी झाली आहे. शिवाय मेकअप केल्यावर मास्क सतत तोंडावर असल्यामुळे घाम येऊन मेकअप सगळा पसरतो.

उष्णता वाढल्यामुळे आणि तोंडावर असलेल्या सततच्या मास्कमुळे घाम जमा होतोय. यामुळे त्वचेवर मुरूम, बारीक पुरळ, त्वचेला खाज सुटणे, त्वचा लाल होणे, मुरुमांचे डाग इत्यादी समस्या उद्भवतात. अशा वेळी मास्क काढल्यानंतर त्या बाजूला आलेला घाम पुसून घ्यायचा. त्वचा कोरडी झाल्यावर तिथे मॉईश्चरायझर पुन्हा लावा. मुरुमे आली असल्यास बेंझॉयल पॅरॉक्साईड जेल वापरा, पण तरीही मुरुमे जात नसल्यास त्वचारोग तज्ञांचा सल्ला घ्या.

कानावर ताण येतो

बऱयाचदा मास्कचे इलॅस्टिक कानांवर ताण देणारे ठरत आहे. स्टायलिश मास्क वापरण्याच्या वेडात आपण आपल्या कानांवर ताण देतोय. अशा वेळी मागे दोऱया असलेले मास्क वापरणे केव्हाही चांगले आणि जास्त सुरक्षित आहे. तसेच मास्क वापरल्यावर त्याची नियमित स्वच्छता राखणे गरजेचे आहे.

त्वचेच्या तक्रारी

मास्क वापरताना अनेकांना त्वचेच्या अनेक तक्रारी येत आहेत. काही मास्क वापरणारे कॉन्टॅक्ट डर्माटायटिस नावाचे पुरळ अनुभवू शकतात. त्यामुळे चेहऱयावर ऍलर्जी, जळजळ हा त्रास होऊ शकतो. त्वचेवर मुरूम, बारीक पुरळ, त्वचेला खाज सुटणे, त्वचा लाल होणे, मुरुमांचे डाग, जळजळ यासारखी लक्षणे दिसून येत आहेत. अशा वेळी मास्क नियमित बदलणे, कापडाचा मास्क वापरत असल्यास तो नियमित स्वच्छ धुऊन वापरणे गरजेचे आहे.

मेकअप करताना

– बऱयाचदा मास्क काढल्यावर लिपस्टिक मास्कला लागते. अशावेळी मॅट लिपस्टिक वापरणं त्यावर पर्याय आहे. लिपस्टिक मॅट करण्यासाठी त्यावर थोडीशी पावडर लावा. त्याने लिपस्टिक लगेच जात नाही.
– मास्क लावल्यानंतर लोकांचे पहिले लक्ष डोळ्यांकडे जाते. त्यामुळे डोळ्यांच्या सौंदर्याला अधिक खुलवता येऊ शकते. त्यासाठी डोळ्यांना आयलायनर, काजळ लावा, आयशॅडोचा वापर करा.
– सध्या ऊन वाढल्यामुळे घामाच्या धारा लागत आहेत. अशा वेळी मेकअप केल्यास तो घामानेच निघून जातो. त्यामुळे चेहऱयावर मेकअप करणं महिला टाळतात, पण त्यासाठी चेहऱयावर वॉटरप्रूफ फाऊंडेशन किंवा प्रायमर, कन्सिलर यांचा वापर करा. त्यामुळे मेकअप जास्त वेळ टिकण्यास मदत होते.

अशी घ्या काळजी

– त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी कोमल, सुगंधरहित क्लीन्झर वापरा. त्यामुळे चेहऱयावरील धूळ, तेल काढण्यास मदत होते.
– क्लीन्झरने चेहरा स्वच्छ केल्यानंतर त्यावर मॉईश्चरायझरचा वापर करा. मॉईश्चरायझर लोशन आणि क्रीम अशा दोन्ही प्रकारांमध्ये मिळतो. त्वचेला ओलावा टिकवून ठेवणं हे मॉईश्चरायझरमुळे शक्य होते.
– मास्कच्या इलॅस्टिकमुळे कानावर ताण येतो. अशा वेळी त्या जागी जस्त किंवा पेट्रोलियम जेली वापरू शकता. आराम मिळतो.