
मास्क ऑर्डरच्या नावाखाली फसवणूक करणाऱयाला वडाळा टी. टी. पोलिसांनी अटक केली. बोदले अब्रार मुस्ताक असे त्याचे नाव आहे. तो सध्या पोलीस कोठडीत आहे. तक्रारदार हे वडाळा परिसरात राहतात. कामगारांचे गणवेश शिवून ते परदेशात पाठवण्याचा त्याचा व्यवसाय आहे. गेल्या महिन्यात त्यांना ओमान आणि फ्रान्स या देशाकडून मास्कची ऑर्डर मिळाली होती. त्यानंतर तक्रारदारांनी गुगल ऍप्सच्या माध्यमातून इंडिया मार्ट या साइटवर मास्कची जाहिरात पाहिली. जाहिरात पाहिल्यावर तक्रारदारांनी मुस्ताकला संपर्क केला. त्याने मास्कचे फोटो आणि व्हिडीओ, जीएसटी, आयएसओ प्रमाणपत्राची मागणी केली. त्यानंतर 14 लाख 40 हजारांत 1 लाख 60 हजार मास्क खरेदी करण्याचे ठरले.
ठरल्यानुसार तक्रारदारांनी सुरुवातीला चार लाख रुपये मोबाईल ऍप्सवरून बँक खात्यात जमा केले, पण मुस्ताकने बनावट नावाने कंपनी तयार करून पैसे एका खात्यात वळते केले. पैसे दिल्यानंतर मास्कबाबत विचारणा केल्यावर मुस्ताक हा उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. तक्रारदारांनी वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला. कौशल्याचा वापर करून पोलिसांनी मुस्ताकची माहिती काढली. त्याला जे. जे. मार्ग परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली. अटक करून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याने आतापर्यंत किती जणांची फसवणूक केली याचा पोलीस तपास करत आहेत.

























































