
मंगळवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तब्बल 14 कोटी रुपयांचे मास्क जप्त केले होते. 25 लाख मास्कचा साठा पोलिसांनी पकडला होता. याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी पोलिसांनी पुन्हा एकदा मास्कचा मोठा साठा पकडला आहे. या मास्कची किंमत बाजारभावानुसार 1 कोटी रुपये इतकी आहे. अंधेरी पूर्वेला असलेल्या शहा हाऊजिंग आणि ट्रान्सपोर्ट गोदामातून हा साठा ताब्यात घेण्यात आला आहे. या गोदामामध्ये मास्क लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली होती, या माहितीच्या आधारे विलेपार्ले आणि सहार पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांविरोधात कारवाई केली आहे.
कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे मास्क आणि सॅनिटायझरचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये करण्यात आला आहे.सध्या बाजारात या मास्कना मोठी किंमत असून त्याचा फायदा उचलत साठेबाजांनी मास्कचा हा साठा जमा करून ठेवला होता. बाजारातील किंमतीपेक्षा जास्त दराने विकून नफा कमावण्याचा आरोपींचा प्रयत्न होता. मास्कसह इतर जीवनावश्यक वस्तूंचा अनावश्यक साठा करणाऱ्यांविरूद्ध पोलिसांची कारवाई यापुढेही चालू राहील असं सांगण्यात आलं आहे. साठेबाजी करणाऱ्यांनी अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करण्यापासून दूर रहावे असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.



























































