
मास्क आणि सॅनिटायझरसाठी सध्या अवाच्या सवा किंमत मोजावी लागत आहे. या किमती नियंत्रणात आणण्याचे सरकारने ठरवले असून यासाठी आरोग्य विभागाने चार सदस्यीय समिती नेमली आहे. ही समिती तीन दिवसात अहवाल सादर करणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
कोरोनाच्या प्रादुर्भाकामुळे मास्क आणि सॅनिटायजरचा वापर वाढला असून त्यांच्या किमती निश्चित करण्यासाठी राज्य शासनामार्फत समिती गठीत करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे व अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार 31 जुलै रोजी आरोग्य विभागाने शासन निर्णयाद्वारे समिती नेमली. राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे समितीचे अध्यक्ष असून हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालक, राज्य औषध नियंत्रण प्राधिकारी सहआयुक्त तर आरोग्य संचालक समितीचे सदस्य सचिव आहेत. मास्क आणि सॅनिटायजरच्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी समितीने उपाययोजना करताना मास्क आणि सॅनिटायजरच्या कमाल दर मर्यादा ठरवायच्या आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.






















































