मास्क करेल म्युकर मायकोसीसपासून बचाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनातून बरे होऊन घरी आल्यानंतरही अनेकजण पूर्णपणे ठणठणीत बरे होत नाहीत. त्यांना पूर्ण बरे होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागतो, तर काहींच्या प्रकृतीतील गुंतागुंत आणखी वाढलेली दिसून येत आहे. त्यातच आता म्युकर मायकोसीस या बुरशीजन्य आजाराने डोळे तसेच मेंदूवर घातक परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. धन्वंतरी रुग्णालयाचे कान-नाक-घसा तज्ञ डॉ. अंकित जैन यांच्याशी केलेली बातचीत.

कोरोनातून बरे झाल्यानंतरही रुग्णांना कोणत्या शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते?

– कोरोनानंतर रुग्णांमध्ये सर्वसामान्यतः घ्राणेंद्रिय म्हणजेच नाकातील वास घेणाऱया ग्रंथी कमजोर झाल्यामुळे कोणताच वास सहा-सहा महिन्यांपर्यंत येत नसल्याचे आढळून आाले आहे. त्याचप्रमाणे काही रुग्णांच्या फुप्फुसांना इजा झाल्याने फायब्रोसिससारखा आजारालाही सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे सध्या अधिक धोका जाणवतो आहे तो म्हणजे म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराचा. याचा परिणाम रुग्णांच्या डोळे आणि मेंदूवरही होत आहे.

वास न येण्यावर विशेष काही उपचार?

– कोणताही गंध न येण्यावर विशेष उपचार नाहीत. मात्र ही व्याधी आपोआपच बरी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यावर वेगळे असे उपचार नाहीत.

फुप्फुसांमध्ये होणारा फायब्रोसिस कसा बरा होतो?

– कोरोनातून बरे झाल्यानंतर फुप्फुसाचा विशिष्ट भाग खराब झाल्यामुळे रुग्णांना फायब्रोसिसच्या आजाराचा सामना करावा लागतो. हा आजार स्टिरॉइड थेरपी तसेच योग्य उपचार पद्धतीने बरा केला जातो. यातून रुग्ण पूर्णतः बरा होतो.

म्युकर मायकोसीस सध्या खूप बळावतोय, या आजाराची लक्षणे काय आहेत?

– म्युकर मायकोसीस हा बुरशीजन्य आजार आहे. विशेषतः ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कोरोनामुळे कमी होते त्यांच्यामध्ये हा आजार सध्या अधिक प्रमाणात वाढताना दिसत आहे. नाकातूनच हा आजार शरीरात प्रवेश करत असल्याने नाकातून पाणी येणे, दुर्गंधी येणे त्याचप्रमाणे क्वचित प्रसंगी नाकातून रक्त येणे, चेहऱयाला सूज येणे यांसारखी लक्षणे म्युकर मायकोसीसमध्ये आढळून येतात. त्यावर त्वरित उपचार होणे आवश्यक आहे.

शरीरातील कोणत्या अवयवांवर म्युकर मायकोसीस हल्ला करते?

– नाकाद्वारे ही नाकातील सायनसमध्ये प्रवेश करते. इथून ती डोळ्यांच्या ग्रंथी त्याचप्रमाणे अगदी मेंदूपर्यंतही पोहोचू शकते. विशेषतः मधुमेही, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्यांच्यावर या म्युकर मायकोसीसचा अधिक परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे.

हे होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी?

– म्युकर मायकोसीससारखी बुरशी धुळीद्वारे पिंवा खराब वातावरणातून नाकात प्रवेश करत असल्याने नाक-तोंडावर मास्क असायलाच हवा. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी बांधकाम चालू आहे, मोठय़ा प्रमाणात धूळ आहे अशा ठिकाणी जाणे कोरोना रुग्णांनी टाळायला हवे. इतकेच काय अगदी शेतात काम करणाऱयांनीही मास्क हा घालायलाच हवा.