
सामना प्रतिनिधी । नगर
सर्वसामान्य नागरिकांना आपल्या मुलामुलींचे लग्न सोहळे मोठ्या धुमधडाक्यात करावेत, अशी अपेक्षा असते. मात्र, आर्थिक अडचणीमुळे त्यांना ते करता येत नाहीत. अशा परिस्थितीत सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन ही खूप चांगली कल्पना असून त्यामुळे कुटुंबांवर पडणारे मोठे खर्चाचे ओझे दूर करता येईल, आता असे सोहळे ही काळाची गरज झाली आहे, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले.
कल्याण रोडवरील शिवाजीनगर येथे बालाजी, विठ्ठल रुख्मिणी मंदिराच्या वतीने बालाजी उत्सव या धार्मिक सोहळ्यात सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अनिल राठोड बोलत होते. यावेळी माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक गणेश कवडे, शाम नळकांडे, सचिन शिंदे आदी उपस्थित होते. अनिल राठोड म्हणाले, समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतून शिवसेनेचे नगरसेवक शाम नळकांडे व सामाजिक कार्यकर्ते राम नळकांडे हे या परिसरात काम करत आहेत. सर्वसामान्य घरातील या कार्यकर्त्यांचे काम खरच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गारही राठोड यांनी यावेळी काढले. नगरसेवक शाम नळकांडे म्हणाले, विविध विकास कामांबरोबरच सामाजिक उपक्रम राबवून समाजाची सेवा करण्यात येत आहे. दरवर्षी बालाजी, विठ्ठल रुख्मिणी मंदिराच्या वतीने बालाजी उत्सव व विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यामध्ये या परिसरातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांना सहभागी करून घेतले जाते. या पुढील काळात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काम करण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.






























































