आता रेल्वेत करून घ्या मसाज! इंदूरहून सुटणार्‍या गाड्यांमध्ये सुविधा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

प्रवास बसचा असो की रेल्वेचा, शरीर थकून जाते. प्रवास करून आल्यानंतर काम करण्याचा उत्साहच राहत नाही. मात्र, आता रेल्वेने त्यावर मस्त तोडगा काढला आहे. इंदूरहून सुटणार्‍या गाड्यांमध्ये आता मसाज करून मिळणार आहे. गोल्ड, डायमंड आणि प्लॅटिनम अशा पॅकेजमध्ये हा मसाज करून मिळणार असून त्यासाठी प्रवाशांना 100 ते 300 रुपये मोजावे लागणार आहेत.

पश्चिम रेल्वेच्या रतलाम विभागाने हा प्रस्ताव मांडला आहे. रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच चालत्या गाडीमध्ये प्रवाशांना मसाज करून देण्यात येणार आहे. इंदूरहून सुटणार्‍या इंटरसिटी एक्प्रेस, अमृतसर एक्प्रेस, डेहराडून एक्प्रेस, मालवा एक्प्रेस, अवंतिका एक्प्रेस, क्षिप्रा एक्प्रेस, नर्मदा एक्प्रेस यांसह 39 गाड्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मसाजची ही सेवा येत्या 20 दिवसांत सुरू होणार आहे. या मार्गावर हा प्रयोग यशस्वी झाला तर दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, जम्मू आदी ठिकाणीही ही सेवा उपलब्ध करून देण्याचा रेल्वेचा विचार आहे.

  • प्रत्येक गाडीमध्ये तीन ते चार प्रशिक्षित मालिश करणारे ठेवण्यात येणार असून ते सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रवाशांना त्यांच्या बर्थवर जाऊन सेवा देणार आहेत. या मालिश करणारांचे फोन नंबर टीटीई आणि कोचमध्ये उपलब्ध करून देण्यात येतील.
  • गोल्ड, डायमंड आणि प्लॅटिनम अशा तीन प्रकारच्या पॅकेजमध्ये ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गोल्ड पॅकेजमध्ये 15 ते 20 मिनिटे जैतूनच्या तेलाने मालिश करण्यात येईल. डायमंड व प्लॅटिनम पॅकेजमध्ये तेलाबरोबरच क्रीम तसेच वाइप्सने मसाज करण्यात येईल.