दादरचा बाजार हाऊसफुल्ल, दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; टिळक पुलावर वाहनांच्या लांबलचक रांगा

दादर मार्केटमध्ये दिवाळीनिमित्त आकाशकंदील, पणत्या, तोरण, फटाके, रांगोळी, हार-फुले, रेडिमेड फराळ, कपडे आदी साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची हाऊसफुल्ल गर्दी झाली होती. सायंकाळच्या वेळी मार्केटमध्ये मुंगी शिरायलादेखील जागा नव्हती. हातात सामानाचे जड ओझे घेऊन गर्दीतून कशीबशी वाट काढत रेल्वे स्टेशन गाठताना मुंबईकरांना तारेवरची कसरत करावी लागली. मार्केटमधील गर्दीमुळे वाहतुकीस होणारा अडथळा त्यातच एल्फिन्स्टन पूल बंद असल्यामुळे टिळक पुलावर लागलेल्या वाहनांच्या लांबलचक रांगा यामुळे मुंबईकरांची दादरमध्ये कोंडी झाली.

दिवाळीला शुक्रवारपासून सुरुवात झाली असून शनिवार वीकेंडचा मुहूर्त साधत अनेकांनी सहकुटुंब खरेदीसाठी थेट दादर मार्केट गाठले. लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱया साहित्यापासून ते घराच्या सजावटीचे पडदे, तोरण अशा दिवाळीसाठी लागणाऱया विविध वस्तूंनी दादरमधील बाजारपेठा फुलल्या आहेत. रस्त्याच्या दुतर्फा लागलेले स्टॉल आणि अनधिकृत पार्किंगमुळे गर्दीतून वाट काढताना सर्वसामान्यांच्या नाकीनऊ आले. खासकरून महिला आणि वृद्धांचे हाल झाले. दादर रेल्वे स्टेशनपासून मुख्य रस्त्यावर पोहोचण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे लागत होती. खासगी गाडय़ा घेऊन खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांचा अर्धा वेळ ट्रफिकमध्येच गेला.