
रामलल्लाच्या नगरीत, अयोध्येत परिवहन मंत्री दयाशंकर सिंह यांनी आयोजित केलेल्या महायज्ञादरम्यान मोठी दुर्घटना घडली. राजघाटावर सुरू असलेल्या महायज्ञात यज्ञपुंडात अर्पण केलेल्या एका नारळाचा स्पह्ट झाला आणि त्यातील ठिणग्या बाजूच्या कापडी पंडालवर पडल्यामुळे यज्ञशाळेला भीषण आग लागली.
अयोध्या येथील राजघाटावर बटी बाबा आश्रमाजवळ असलेल्या महालक्ष्मी नारायण यज्ञशाळेत 20 ते 28 मार्च असे नऊ दिवस महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. या यज्ञाचा शनिवारी शेवटचा दिवस होता. सकाळी 11.30 च्या सुमारास पूर्णाहुतीसह यज्ञ संपन्न झाला. यावेळी यज्ञशाळेत विधी सुरू असताना एका नारळाचा स्पह्ट झाला. हा स्पह्ट इतका भीषण होता की, त्यातील आगीच्या ठिणग्या छताला आणि बाजूच्या पंडालला जाऊन चिकटल्या. कोरडय़ा हवामानामुळे आगीने काही मिनिटांतच संपूर्ण यज्ञशाळेला विळखा घातला. भक्तांच्या निवासासाठी उभारण्यात आलेले तात्पुरते तंबू या आगीत जळून खाक झाले.
























































