
शहराजवळील सिद्धेश्वर वनविहारात दुपारी लागलेल्या भीषण आगीत सुमारे 15 एकरांवरील वनसंपत्ती जळून खाक झाली आहे. यात अनेक पशू व पक्ष्यांचाही मृत्यू झाला असून, या वनविहाराजवळ असलेल्या राजस्वनगर सोसायटी व गणेशनगर सोसायटीतील कचऱ्यातील आगीमुळे ही घटना घडल्याची प्रथमदर्शनी माहिती पुढे आल्याने वन विभागाकडून या दोन्ही सोसायटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पालिकेच्या अग्निशमन दलाने सायंकाळी या आगीवर नियंत्रण मिळविले आहे.
सोलापूर शहराच्या जवळच वनसंपत्तीने बहरलेले सिद्धेश्वर वनविहार आहे. येथे औषधी व दुर्मिळ वनस्पती व झाडे आहेत. या वनविहारालगत काही वर्षांपूर्वी राजस्वनगर व गणेश सोसायटी या सोसायटय़ा वसविण्यात आल्या आहेत. या सोसायटय़ांमधील कचरा वनविहाराला लागूनच टाकण्यात येतो. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास या कचऱयाला आग लावण्यात आली होती. या कचऱयातील आगीने भीषण रूप घेत वनविहारात पसरली. यामुळे अवघ्या तीन ते चार तासांत भीषण आगीत वनविहारातील 15 एकरांवरील वनस्पती, पशू-पक्षी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीची घटना पालिकेच्या अग्निशमन दलाला कळताच ही आग विझविण्याचे प्रयत्न सुरू झाले. जवळपास तीन ते चार गाडय़ा पाणी मारून सायंकाळी आग आटोक्यात आणण्यात आली.
वन अधिकाऱ्यांनी या आगीची माहिती घेतली असता, वनविहाराच्या बाजूला असलेल्या कचऱ्यातील आगीमुळे ही घटना घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. या आगीत राजस्वनगर सोसायटी व गणेश सोसायटी जबाबदार असल्याचे वन अधिकाऱयांचे मत असून, पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या घटनेचा तपास वनपरिक्षेत्र अधिकारी डी. पी. खलाणे करणार आहेत.


























































