राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करा! राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेबरोबर केलेला व्यापार करार हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे सरेंडर आहे, असा घणाघात करतानाच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारचा संसदेत पर्दाफाश केला. तसेच, माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे पुस्तक, एफस्टीन फाईल्स या मुद्दय़ांवरूनही त्यांनी वारंवार जोरदार हल्ला चढविला. यामुळे बिथरलेल्या भाजपने थयथयाट करून राहुल गांधी यांची खासदारची रद्द करण्याची मागणी करणारा प्रस्ताव लोकसभेत मांडला. राहुल यांना निवडणूक लढविण्यास कायमची बंदी घालावी, अशीही मागणी केली.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, लोकसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. सत्ताधारी भाजपकडून राहुल गांधींना बोलू न देण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांनी वारंवार लोकसभेत आणि सभागृहाबाहेर मोदी सरकारवर अनेकदा जोरदार हल्ला चढवला आहे. राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देण्याऐवजी मोदी सरकार आणि भाजपने थयथयाट सुरू केला आहे.

राहुल गांधींनी संसदेत निराधार विधाने करून देशाची दिशाभूल केल्याचा आरोप करीत भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी आज लोकसभेत ‘स्वतंत्र प्रस्ताव’ (सबस्टँटिव्ह मोशन) सादर केला आहे. राहुल गांधींचे संसदेचे सदस्यत्व रद्द करावे आणि त्यांच्यावर निवडणूक लढवण्यास कायमची बंदी घालावी, अशी मागणी दुबे यांनी केली आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष तीव्र होणार आहे.

यापूर्वीही रद्द झाले होते सदस्यत्व

राहुल गांधी यांचे मार्च 2023 मध्ये लोकसभा सदस्यत्व रद्द झाले होते. 2019च्या निवडणूक प्रचाराच्या भाषणात राहुल गांधी यांनी ‘सर्व चोरांना मोदी हे आडनाव कसे असते’ असे वक्तव्य केले होते. त्यावर मानहानीच्या खटल्यात सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर तत्काळ लोकप्रतिनिधी कायद्याच्या आधारे राहुल गांधींची खासदारकी रद्द केली होती. सर्वोच्च न्यायालयाने 4 ऑगस्ट 2023 रोजी त्यांच्या शिक्षेला अंतरिम स्थगिती दिली. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने 7 ऑगस्ट 2023 रोजी राहुल गांधींना पुन्हा लोकसभा सदस्यत्व बहाल केले होते.

‘सबस्टँटिव्ह मोशन’ म्हणजे काय?

‘सबस्टँटिव्ह मोशन’ हा सभागृहाच्या मंजुरीसाठी सादर केलेला एक स्वतंत्र प्रस्ताव असतो. विशिष्ट मुद्दय़ांवर सभागृह थेट चर्चा करू शकते आणि त्यावर निर्णय घेऊ शकते. कोणताही संसद सदस्य सभागृहाचे मत जाणून घेण्यासाठी असा प्रस्ताव मांडू शकतो.

मी एक इंचही मागे हटणार नाही – राहुल गांधी

नरेंद्र मोदी यांचा लगाम डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती आहे. त्यामुळेच दबावातून मोदींनी अमेरिकेसोबत डील करून शेतकऱयांचा सौदा केला आहे. देश विकला आहे. हेच सत्य मी संसदेत सांगितले आहे. खुशाल माझ्यावर केस टाका, मला शिव्या द्या, वाटल्यास हक्कभंगाचा प्रस्ताव आणा पण मी एक इंचही मागे हटणार नाही. शेतकऱयांसोबत मी ठाम उभा आहे, असे आज लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ठणकावले. मोदी शेतकरीविरोधी आहेत. अदानी-अंबानीसारख्या मित्रांसाठी आणि विदेशातील महाशक्तींसाठी ते काम करतात. येत्या काळात ते मित्रांसाठी आणि या विदेशी शक्तींसाठी संपूर्ण कृषीबाजाराचे दरवाजे उघडून देतील, असा सावधगिरीचा इशाराही त्यांनी दिला.