
’मिशन मेरिट’ उपक्रम अंतर्गत मुंबई महानगरपालिका व खान अॅकॅडमी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने पालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ‘गणित गुरुवार’ हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून महानगरपालिकेच्या सर्व शाळांतील इयत्ता 6 वी ते 10 वीपर्यंतचे सर्व विद्यार्थी प्रत्येक गुरुवारी रात्री 8 ते 10 वाजेदरम्यान किमान 30 मिनिटे खान अॅकॅडमी या डिजिटल प्लॅटफॉर्मवर गणिताचा सराव करतील. विद्यार्थ्यांनी गणित विषयात शिस्त, सातत्य आणि प्रावीण्य मिळवावे, यासाठी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उप आयुक्त प्राची जांभेकर यांच्या सूचनेनुसार पालिकेतील विद्यार्थ्यांसाठी विविध अभिनव उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतात. पालक-शिक्षक सभा, व्हॉट्सअॅप ग्रुप व शिक्षक-पालक संवादामुळे हा उपक्रम शालेय वेळेनंतरही प्रभावी होणार आहे.
प्रत्येक गुरुवारी पालिकेच्या शाळांतील शिक्षक इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आठवण करून देतील की, त्यांनी खान अॅकॅडमी प्लॅटफॉर्मवर लॉग इन करून गणिताचा सराव आणि असाइनमेंट पूर्ण कराव्यात. खान अॅकॅडमी प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी घालवलेला वेळ व त्यांनी सराव केलेल्या कौशल्यांची नोंद केली जाईल. शिक्षण विभागामार्फत सर्व शाळांमध्ये याबाबत पाठपुरावा केला जाईल.