माथेरानची राणी ‘परीक्षे’त पास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘ती आली.. तिने पाहिले.. आणि ती जिंकली’.. असा अनोखा थाट असलेली माथेरानची राणी ऐन नाताळमध्ये घेतलेल्या ‘परीक्षे’त अखेर पास झाली आहे. सर्व तांत्रिक अडथळे पार करीत राणीने सर्वांची मने जिंकत आपला डामडौल कायम ठेवला असून लवकरच ही मिनी ट्रेन अमन लॉज ते माथेरानदरम्यान धावणार आहे. त्यामुळे नववर्षाचे स्वागत व नाताळच्या सुट्टीत धम्माल करण्यासाठी माथेरानला येणाऱया पर्यटकांना मोठी पर्वणी मिळणार आहे. झुक।।  झुक।। धावणाऱया आगीनगाडीतून निसर्गाच्या साक्षीने मनासारखा प्रवास करायला मिळणार असल्याने बच्चे कंपनीदेखील बेहद्द खूश झाली आहे.

मुसळधार पावसात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने गेल्या पाच महिन्यांपासून माथेरानची मिनी ट्रेन बंद होती. त्यामुळे पर्यटन व्यवसायावर गंभीर परिणाम झाला. ही ट्रेन किमान अमन लॉज ते माथेरानदरम्यान तरी सुरू करावी, अशी मागणी स्थानिकांनी तसेच असंख्य पर्यटकांनी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. त्याची गंभीर दखल घेण्यात आली. आज या ट्रेनची रेल्वे अधिकाऱयांच्या उपस्थितीत तांत्रिक चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी होताच माथेरान स्थानकात कर्मचाऱयांनी मिठाई वाटून आपला आनंद व्यक्त केला.

  •  रेल्वेच्या कल्याण विभागातील इंजिनीयरिंग शाखेचे अधिकारी वाय. के. सिंग यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून राणीच्या इंजिनाला पुष्पहार अर्पण केला. अमन लॉज ते माथेरान हा प्रवास राणीने आपल्या नेहमीच्याच डौलात केला.
  • मुसळधार पाऊस तसेच कोसळलेल्या दरडी यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून मिनी ट्रेन माथेरान स्थानकात उभी होती. आज दुपारी 1 च्या सुमारास या ट्रेनची चाचणी घेण्यात आली. ती यशस्वीदेखील झाली.
  • मिनी ट्रेनचे इंजिन व डबे खराब होऊ नयेत म्हणून रेल्वेचे कर्मचारी   रोज ऑयलिंग करत होते. त्यासाठी लागणारे इंधन हे कर्मचारी नेरळहून दस्तुरी नाका येथे टॅक्सीने घेऊन यायचे. त्यानंतर दस्तुरी नाका ते माथेरान स्टेशनपर्यंत इंधन भरलेले कॅन डोक्यावर घेऊन जात असत. गेल्या सहा महिन्यांची ही मेहनत आता फळाला आली आहे.

30 रुपये तिकीट

अमन लॉज ते माथेरान यादरम्यान माथेरानची राणी लवकरच धावणार असून त्यासाठी पर्यटकांना सेकंद क्लाससाठी फक्त 30 रुपये तिकीट द्यावे लागेल. फर्स्ट क्लाससाठी मात्र तब्बल 300 रुपये मोजावे लागणार आहेत. अमन लॉज ते माथेरान हे अंतर तीन किलोमीटर एवढे असून गाडीने पंधरा मिनिटांत पोहोचता येते. चालत जायचे असल्यास किमान एक तास लागतो. मिनी ट्रेनला एकूण पाच डबे व दोन इंजिन असून दीडशे प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतील.