बारा बलुतेदार, प्राचीन कला, शिल्पं, ‘शिल्पग्राम’ लोकप्रिय!

बारा बलुतेदार कार्यपद्धती, प्राचीन खेळ, कला, शिल्पं, सांगीतिक जॉगिंग ट्रक, खुला रंगमंच-संगीत कारंजे अशी विविधांगी सांस्कृतिक माहिती देणारे हरित केंद्र असलेले जोगेश्वरी येथील ‘मातोश्री मीनाताई ठाकरे’ शिल्पग्राम लोकप्रिय ठरत आहे.

जोगेश्वरी (पूर्व) येथे जोगेश्वरी-किक्रोळी जोड मार्गाकर पूनम नगर परिसरात तब्बल 55 हजार चौरस मीटर क्षेत्रावर मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम उद्यान साकारण्यात आले आहे. या ठिकाणी केवळ उद्यान नाही तर सांस्कृतिक वारसा उलगडून दाखवणारे हरित केंद्रदेखील आहे. या ठिकाणी बारा बलुतेदार, प्राचीन खेळ, नृत्य यांची शिल्पं आहेत. महाराष्ट्राच्या व देशाच्या प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडविणारे बारा बलुतेदार यांची घरे, त्यांच्या कामाचे स्वरुप, प्राचीन खेळ व नृत्य परंपरा यांची शिल्पं पाहताना मुले आणि वडीलधारीदेखील हरखून जातात. इतिहासातील माहिती शिल्प रूपामध्ये पाहून मुलांना सांस्कृतिक आकलन करणे सहज सोपे तर ठरतेच, समकेत विरंगुळ्यातून शिक्षणदेखील मिळते. शिल्पग्राम उद्यान सकाळी  6 ते 10 आणि दुपारी 4 ते रात्री 8 दरम्यान नागरिकांकरिता खुले असते. दर बुधवारी नियमित परिरक्षणाकरिता ते बंद असते. रविवार व इतर सार्वजनिक सुट्टीदरम्यान नागरिक शिल्पग्रामला भेट देऊन आनंद लुटू शकतात.

एम्फी थिएटर, संगीत, नृत्य, मुक्त संवाद

शिल्प ग्राममध्ये खुला रंगमंच (एम्फीथिएटर) देखील तयार करण्यात आला आहे. संगीत, नृत्य, मुक्त संवाद, चर्चासत्र, सभा इत्यादी विविध कार्यक्रमांसाठी किमान  500 व्यक्ती बसू शकतील इतक्या क्षमतेचा हा खुला रंगमंच आहे.

या उद्यानात आकर्षक हिरवळ व वृक्षवेली आहेत. हिरवळीसोबत विविध प्रजातीचे वृक्ष, वेली, झुडपे ठिकठिकाणी असल्याने सदर उद्यानाच्या सौंदर्यात ती भर घालतात. संगीतमय कारंजे आणि सांगीतिक पदपथ हे आणखी महत्त्वाचे आकर्षण या ठिकाणी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या