
मनोज मोघे
फेब्रुवारीपर्यंत अगदी नियंत्रणात आलेल्या कोरोनाचा त्यानंतर अचानक उद्रेक झाला. कोरोनाची दुसरी लाट आली. ही लाट कधी ओसरणार याचा अंदाज बांधणे कठीण झाले होते. मात्र मागील काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या ठराविक अंकावर स्थिरावली असून एका उच्चांकापर्यंत गेल्यावर ही लाट आता स्थिरावली असून 31 एप्रिलपर्यंत ही लाट ओसरणार असून ‘मे’च्या पहिल्या आठवडय़ात ती पूर्णतः ओसरेल आणि कोरोनाची रुग्णसंख्या व मृत्यूदर कमी होईल असा अंदाज टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टरांनी वर्तवला आहे.
कोरोनाची दुसरी लाट स्थिरावणार असली तरी यापुढेही कोरोनाचा आपल्याला सामना करावा लागणार आहे, असे तज्ञांचे मत आहे. यासाठी आपल्याला व्हॅक्सिनेशनवर भर द्यावा लागणार असून मोठय़ा इमारती, गावातील मोकळी मैदाने, झोपडपट्टी परिसरात लसीकरणावर अधिक भर द्यायला हवा. यामुळेच कोरोनाशी आपण लढू शकणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत लसीकरणाचा राजकीय आखाडा न होता योग्य नियोजनाने लसीकरण व्हायला हवे, असे या तज्ञांचे म्हणणे आहे.
12 तास लसीकरण हवे
लसीकरण केंद्रे 24 तास सुरू ठेवणे कठीण आहे. त्याऐवजी 12 तास जरी लसीकरण केंद्रे सुरू राहिली तरी मोठय़ा प्रमाणावर लसीकरण होईल. सहा-सहा तासांत शिफ्टमध्ये जर लसीकरण करता आले तर निश्चितच ते परिणामकारक होईल. पहिले सहा तास वृद्ध व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक तसेच जे दिव्यांग आहेत अशांना लसीकरण व्हायला हवे. दुसऱया सहा तासांमध्ये तरुणांना लसीकरण झाल्यास अधिक सोयिस्कर ठरेल. अगदीच गरज असेल तर रुग्णालयांच्या आपत्कालीन विभागातही इमर्जन्सी म्हणून लसीकरण करता येऊ शकेल, असे मत टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केले.
रुग्णसंख्येतील घट सकारात्मक
कोरोनाची उच्चांकी रुग्णवाढ ही 68 हजारांवर होती. मात्र त्यानंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट दिसून येत आहे. दुसरी लाट ओसरण्याच्या सुरुवातीच्या खुणा आता दिसू लागल्या आहेत. मुंबई, पुण्यासारख्या मोठय़ा शहरांत रुग्ण कमी होत आहेत हे सकारात्मक असून आज आढळलेल्या 48 हजार 700 रुग्णांपेक्षा दीडपट रुग्ण हे आजच बरे होऊन घरे गेले आहेत. हे सकारात्मक चिन्ह असून मेच्या पहिल्या किंवा दुसऱया आठवडय़ात ही लाट बऱयापैकी ओसरेल, असा अंदाज राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी वर्तवला.
































































