ईव्हीएममुळे ‘हत्ती’ची मते कमळाकडे! मायावती यांचा गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mayavati

सामना ऑनलाईन । लखनौ

काल झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे) सदोष पद्धतीने कार्य करीत होती. यामुळे ‘हत्ती’ची (बसपाचे निवडणूक चिन्ह) मते कमळाकडे (भाजपचे निवडणूक चिन्ह) जात होती, असा गंभीर आरोप बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी केला आहे.

निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी आणि लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित सहा टप्प्यांत याची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहनही मायावती यांनी केले आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने कडक उपाय लागू केले नाहीत तर सध्या चालू असलेल्या निवडणूक प्रक्रियेला काही अर्थ राहणार नाही, असे मायावती यांनी सांगितले. तसेच यासंदर्भात निश्चित स्वरूपाच्या काही तरी ठोस उपाययोजना केल्या जातील, अशी आपल्याला आशा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ईव्हीएमबाबत अफवा पसरवली, बसपा पोलिंग एजंटवर गुन्हा
मुझफ्फरनगर – बिजनौर लोकसभा मतदारसंघात मतदानावेळी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याची अफवा पसरविल्याप्रकरणी बसपाच्या धारा सिंह या पोलिंग एजंटविरोधात निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला आहे. बिजनौरच्या कसोली मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार झाली असून बसपा उमेदवाराला मतदान केल्यानंतर भाजपच्या उमेदवाराला मत जात असल्याचा दावा धारा सिंहने केला होता. याबाबत बसपाने निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली. चौकशीत धारा सिंहच्या आरोपात तथ्य नसल्याचे दिसून आले, असे जिल्हा दंडाधिकारी अजय शंकर पांडेय यांनी सांगितले.