
सामना प्रतिनिधी । मुंबई
महापालिकेतर्फे दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांचा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी स्थायी समिती बैठकीत आढावा घेतला. दिव्यांगाच्या समस्या तत्काळ निकाली काढण्याची सूचना महापौरांनी महापालिका प्रशासनाला केली.
दिव्यागांना 24 विभाग कार्यालयाच्या हद्दीत पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, तसेच निवासस्थान देण्याची मागणी करुन प्रलंबीत समस्या सोडविण्याची मागणी दिव्यांगांनी केली. गतवर्षीच्या 614 अपात्र लाभार्थ्यांना यावर्षी पात्र करण्यात आले असून त्यांना नियमाप्रमाणे मंजूर झालेल्या योजनांचा लाभ दिला जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले. पात्र व्यक्तींना कलर झेरॉक्स मशीन व पंधरा दिवसात दिव्यागांना स्कूटरचे सुध्दा वितरण केले जाणार असून पीसीओ बूथमध्ये 60 वस्तू विक्रीला परवानगी दिल्याचेही महापौरांनी सांगितले. या वेळी उपमहापौर हेमांगी वरळीकर, बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर, उप आयुक्त (निवडणूक) विजय बालमवार तसेच बाजार विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. संगीता हसनाळे उपस्थित होते.





























































