
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) कारभारात सध्या पारदर्शकतेचा अभाव दिसून येत आहे. एमसीए कार्यकारिणीला विश्वासात न घेता, बैठकीत प्रस्ताव न मांडता परस्पर निर्णय घेतले जात आहेत. यामुळे एमसीए पदाधिकाऱयांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. एमसीए कार्यकारिणीतील आठ सदस्यांनी अध्यक्ष विजय पाटील यांना पत्र लिहून याबाबत कळवले असून या प्रकरणावर निर्णय घेण्यासाठी उद्या तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. एमसीएमध्ये सर्वकाही कायद्यानुसार व्हावे, अशी मागणी एमसीए पदाधिकाऱयांकडून या वेळी करण्यात आली आहे.
एमसीए पदाधिकाऱयांकडून काही मुद्दय़ांवर दृष्टिक्षेप टाकण्यात आला आहे. एमसीएतील सेक्रेटरी यांना दैनंदिन खर्चासाठी महिन्याला पाच लाख रुपये दिले जाताहेत. पण पाच लाखांपेक्षा वरील खर्चाबाबतचा तपशील एमसीएच्या बैठकीत होणे गरजेचे आहे. तसेच या बैठकीत जादा खर्चाचा प्रस्ताव पास होणेही गरजेचे आहे, असे पदाधिकाऱयांचे म्हणणे आहे.
सफाळे येथे 19 वर्षांखालील मुलांचा कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे. मुंबईतील बीकेसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा उपलब्ध असताना सफाळे येथे कॅम्प आयोजित करण्याची गरज नाही, असेही एमसीए पदाधिकाऱयांना वाटते. तसेच ओमानला जाणाऱया मुंबई संघाबाबत कोणालाही विश्वासात घेण्यात आले नाही. मुंबईचा संघ निवडून त्याला पाठवण्याचीही घोषणा करण्यात आली. दरम्यान, सर्व प्रकारचे निर्णय बैठकीत घेतले जावेत. नियम, कायद्याला अनुसरून ही सर्व प्रकिया पार पडावी, असे एमसीए पदाधिकाऱयांना वाटते.




























































