पुणे – दीपक मारटकर हत्या प्रकरणी सर्व आरोपींवर मोक्का, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे आदेश

शिवसेनेच्या कसबा विधानसभा मतदारसंघातील युवा सेना पदाधिकारी दीपक विजय मारटकर यांच्या हत्येप्रकरणी सर्व आरोपींवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भात शिवसेनेच्या उपनेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेउन आरोपींविरुद्ध मोक्कानुसार कारवाईची मागणी केली होती.

pune-deepak-maratkar-murder

अश्विनी सोपान कांबळे, महेंद्र मदनलाल सराफ, निरंजन सागर म्हंकाळे, प्रशांत उर्फ सनी प्रकाश कोलते, राहूल श्रीनिवास रागीर, रोहित उर्फ बाळा कमलाकर कांबळे, रोहित दत्तात्रय क्षीरसागर, संदीप उर्फ मुंगळ्या प्रकाश कोलते, लखन मनोहर ढावरे, चंद्रशेखर रामदास वाघेल अशी मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

शिवसेनेचे दिवंगत नगरसेवक विजय मारटकर यांचे पुत्र दीपक यांची 2 ऑक्टोबरला हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी 10 जणांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत सर्वजण टोळीप्रमुख बापू उर्फ प्रभाकर नायर आणि स्वप्नील उर्फ सतीन चॉकलेट मोडवे यांच्या टोळीचे सदस्य असल्याचे निष्पन्न झाले.

बुधवार पेठ परिसररात वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतूने मारटकर यांच्यावर कोयत्याने हल्ला करुन खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. टोळीप्रमुख बापू उर्फ कुमार प्रभाकर नायर आणि त्याच्या साथीदारांनी संघटितरित्या हा गुन्हा केला आहे. त्यांच्याविरुद्ध मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे करीत आहेत.

शिवसेनेच्या आग्रही मागणीला यश
शिवसेनेचे युवा पदाधिकारी दीपक मारटकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपींविरुद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यासाठी शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली होती. शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदास शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली भेट घेण्यात आली होती. त्यावेळी शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. त्याशिवाय सर्वपक्षीय नेत्यांनी तत्कालीन पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरी यांची भेट घेउन कारवाईची मागणी केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या