एमडी विकणारा ‘चुआ’ सापडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

शालेय विद्यार्थ्यांना चॉकलेट, आईक्रीमचे आमिष दाखवून त्यांच्याकरवी कॉलेज विद्यार्थ्यांना एमडी विकणारा सराईत ड्रग्ज पेडलर चुआ अखेर सापडला. अमली पदार्थविरोधी कक्षाच्या वांद्रे युनिटने चुआला दीड लाखाच्या एमडीसह रंगेहाथ पकडले.

अंधेरी पश्चिमेकडील गावदेवी डोंगर परिसरात असिफ इक्बाल खान ऊर्फ चुआ (34) या ड्रग्ज तस्कराने अक्षरशः थैमान घातले होते. अंधेरीतील कॉलेज विद्यार्थ्यांना चुआ मोठय़ा प्रमाणात एमडीची विक्री करीत होता. त्यामुळे वांद्रे युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल वाढवणे व त्यांचे पथक चुआच्या शोधात होते. कॉलेज विद्यार्थ्यांना एमडी विकण्यासाठी तो शाळेच्या विद्यार्थ्यांना हाताशी घेत होता. लहान मुलांना चॉकलेट, आईक्रीम देऊन त्यांना एक ग्रॅमची पुडी कॉलेज विद्यार्थ्यांला जाऊन देण्यास सांगायचा. अखेर वाढवणे व त्यांच्या पथकाने विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या नशेत अडकविणाऱया असिफच्या मुसक्या आवळल्या.

एमडीच्या ग्राहक विद्यार्थिनी जास्त

चुआकडून एमडीची खरेदी करणाऱयांमध्ये कॉलेज विद्यार्थिनींची संख्या जास्त असल्याचे उपायुक्त शिवदीप लांडे यांनी सांगितले. विद्यार्थिनी मोठय़ा प्रमाणात एमडीचे सेवन करीत असल्याचे चुआच्या चौकशीतून समोर आले आहे. चुआ पूर्वी गांजा आणि चरसची विक्री करायचा. 2012 मध्ये त्याला अटकदेखील झाली होती, पण यावेळी तो पुन्हा पोलिसांच्या हाती लागला.

चार वेळा ट्रायल घेऊन पाचव्यांदा पकडले

पोलिसांनी एका कॉलेज विद्यार्थ्याला हाताशी घेतले. त्या विद्यार्थ्याला त्यांनी चुआला कॉल करून एमडीची मागणी केली. अशा प्रकारे त्या विद्यार्थ्याने चार वेळा चुआशी संपर्प साधून त्याच्याकडून एमडी विकत घेतला, पण तो एक ग्रॅमपेक्षा जास्त कोणालाच विकत नव्हता. त्यामुळे त्याला पकडणे पोलिसांना मुष्कील झाले होते. अखेर मित्रांची पार्टी आहे, त्यासाठी जास्त एमडी हवी अशी गयावया त्या विद्यार्थ्याला करायला लावली. हा प्लॅन यशस्वी ठरला. चुआ त्याला 60 ग्रॅम एमडी देण्यास तयार झाला. यावेळी त्याने लहान मुलाकडून एमडी न पाठवता स्वतः ठरलेल्या ठिकाणी घेऊन आला. तो येताच आधीच सापळा रचून बसलेल्या पोलिसांनी त्याला एमडीसह रंगेहाथ पकडले.