
मुंबई गोवर रुग्णसंख्या वाढतच असून आज एकाच दिवसांत 115 गोवर संशयित रुग्ण आढळले असून एका एक वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. तर 11 जणांमध्ये गोवरचे निदान झाले. यामुळे मुंबईतील गोवर रुग्णांची एकूण रुग्णसंख्या 303 वर पोहोचली आहे.
अंधेरीतील 1 वर्षाच्या मुलीचा आज गोवरने मृत्यू झाला. या मुलीचे लसीकरण झालेले नव्हते. या बाळाला जन्मपासून हृदयविकाराचा त्रास होता. महिनाभर खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर दोन आठवडयांपूर्वी पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या मुलीला अंगावर पुरळ आणि श्वसनाचा त्रासही होत होता. सर्व अत्यावश्यक उपचार करूनही रुग्णाची प्रकृती खालावत गेल्याने या मुलीचा मृत्यू झाल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
मुंबईत चार हजार पार संशयित
मुंबईत गोवर संशयितांची संख्याही वाढत आहे. एकाच दिवसांत 115 गोवर संशयित रुग्ण आढळल्यामुळे मुंबईतील एकूण गोवर संशयित रुग्णांची संख्या 4 हजार 62 वर पोहोचली आहे.
दरम्यान, गोवरला आळा घालण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत 53 लाख 66 हजार 144 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
या ठिकाणी संशयितांवर आवश्यक उपचार, जिवनसत्त्व ‘अ’च्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. आज दिवसभरात 78 रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले तर 49 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.