अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांना आता ‘मेडा’चे पाठबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात अपारंपरिक ऊर्जा म्हणजे सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांना आता महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाचे (मेडा) पाठबळ मिळणार आहे. त्यानुसार संबंधित कंपनीला ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक असलेली जमीन आणि परवानग्या तत्काळ मिळवून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मेडाची नोडल एजन्सी म्हणून नेमणूक केली आहे. तसेच प्रकल्प उभारण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता यावा म्हणून स्वतंत्र वेब पोर्टल सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्य सरकारने 2025 पर्यंत राज्यात तब्बल 17 हजार मेगावॅटहून अधिक क्षमतेचे अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्या पार्श्वभूमीवर सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीला चालना मिळावी, त्यांना भेडसावणाऱया समस्या तत्काळ मार्गी लागाव्यात म्हणून ऊर्जा मंत्र्यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. यावेळी राज्यात सौर पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यास, गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मेडाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानुसार प्रकल्पाला लागणारी जमीन, परवानग्या मिळवून देण्यासाठी मेडा मदतीचा हात पुढे करणार आहे. तसेच अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या धोरणाची मिशन मोडवर अंमलबजावणी करण्याचे निर्देश ऊर्जा मंत्र्यांनी दिले. यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, मेडाचे महासंचालक सुभाष डुंबरे आदी उपस्थित होते.