म्हसळा तालुक्यातील मेदडी पूल खचला, अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची झाली दुर्दशा

618

अलिबागमधील म्हसळा तालुक्यातील मेंदडी ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय मार्गावरील नवाबकालीन पूल दिघी पोर्टच्या अवजड वाहतुकीमुळे खचला आहे. याच मार्गावरून दहा किलोमीटर पुढे पर्यटन क्षेत्र दिवेआगर असून हा पूल तुटल्यास या पर्यटन क्षेत्रासोबत परिसरातील नऊ हजार ग्रामस्थांचा तालुक्यासोबत संपर्क तुटण्याची भीती वर्तवली जात आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील दिघी पोर्ट येथे दिवसातून दीडशे ते दोनशे अवजड लोह कॉईल वाहतूक करणारे ट्रेलर दिघी-म्हसळा मार्गे माणगाव तालुक्यातील पोस्को कंपनीमध्ये नागरी वाहतुकीच्या रस्त्यावरून जात असतात. दिघी-माणगाव मार्गामध्ये असणाऱ्या मध्ये छोट्या मोठ्या पूलावरून क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक होत असल्यानेच मेंदडी येथील पुलाची अवस्था दयनीय झाली आहे. हा पूल एक बाजूने खचला आहे. मेंदडी येथील पूलावरून दिघी पोर्टची अवजड वाहतूक सुरू राहिल्यास आठवड्याच्या आताच हा पूल कोसळून पर्यटन क्षेत्र दिवेआगर सोबत परिसरातील वारळ, काळसूरी, रोहिणी तुरुंबाडी, गोंडघर या गावातील तब्बल नऊ हजार ग्रामस्थांचा म्हसळा तालुक्यासोबत संपर्क तुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मेंदडी येथील कमकुवत असणारा पूल जो पर्यंत नवीन बांधून होत नाही तो पर्यंत या पूलावरून दिघी पोर्टची अवजड वाहतूक बंद करावी, नाहीतर दिघी पोर्टच्या अवजड वाहतुकी विरोधात ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी मेंदडी ग्रामपंचायत सदस्य नदिम कादरी यांनी सांगितले. सदर पुलाची पोलीस उपनिरीक्षक दिपक धूस, ग्रामसेवक मच्छिंद्र पाटील, सरपंच राजेश्री कांबळे, सदस्य नदीम कादरी, महादेव धुमाल, काश्या वाघमारे, तलाठी गिरे, शेळके यांनी पाहणी करून पुलाबाबत माहिती संबंधित विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे येथील अवजड वाहतूक त्वरित बंद करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या