
>> मेधा पालकर
एक निवृत्त शिक्षिका आपल्या आयुष्यभराच्या कमाईतील मोठा भाग आपली कारकीर्द घडलेल्या संस्थेला देण्याची घटना खरोखरच दुर्मिळ आहे. पुण्यातल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या माजी विद्यार्थिनी, माजी शिक्षिका आणि संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाच्या माजी सदस्या माणिक फुलंब्रीकर यांनी आपल्या प्रॉव्हिडंट फंडामध्ये जमा झालेला तब्बल 1 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला दिला. त्यांची ही कृती दातृत्वाचा अद्वितीय आदर्शच ठरली आहे.
मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या छोटेखानी कार्यक्रमात फुलंब्रीकर यांनी हा निधी मएसोच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. फुलंब्रीकर यांना याविषयी विचारले असता त्या म्हणाल्या, एक विद्यार्थिनी आणि शिक्षिका म्हणून 1973 ते 2015 असा प्रदीर्घ काळ संस्थेशी माझा संबंध आला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात माझे व्यक्तिमत्त्व फुलले, संस्थेने मला ओळख दिली. त्यामुळे संस्थेबद्दल वाटणारे प्रेम मनाच्या तळातून आलेले आहे. आज मी देत असलेल्या निधीपेक्षा संस्थेने मला किती तरी पटीने अधिक दिले आहे, अशा शब्दांत माणिक फुलंब्रीकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
बाबासाहेब शिंदे म्हणाले, “एका मध्यमवर्गीय व्यक्तीने, निवृत्त शिक्षिकेने आपल्या स्वकमाईचा इतका मोठा भाग देणगी म्हणून देण्याचा हा प्रसंग दुर्मिळ आहे. अशाच शिक्षक व माजी विद्यार्थ्यांच्या आधारे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा वटवृक्ष उभा आहे. फुलंब्रीकर यांचा संस्थेशी प्रदीर्घ ऋणानुबंध आहे, त्यांनी घालून दिलेले उदाहरण कायमस्वरुपी लोकांच्या चर्चेत राहील आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक जण त्यांचे अनुकरणदेखील करतील याची मला खात्री आहे. त्यांच्या इच्छेनुसार या निधीतून महाविद्यालयातील प्रयोगशाळांचे नूतनीकरण करण्यात येणार येईल. फुलंब्रीकर यांची कोणतीही अपेक्षा नसली तरी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्राच्या प्रयोगशाळेला त्यांचे नाव देण्यात येईल.’’































































