
कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर अनेक होलसेल औषध दुकाने अद्याप बंद आहेत त्याशिवाय औषधांची वाहतूक ही पूर्ववत सुरू झालेली नाही, त्यामुळे छोट्या औषध दुकानात मोठ्या प्रमाणात आवश्यक असलेल्या औषधांची टंचाई जाणवत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.
सर्दी, ताप, डोकेदुखी असे आजार दिसू लागताच रुग्ण तात्काळ औषध दुकानात धाव घेऊन औषधांची मागणी करीत आहेत. छोट्या दुकानांना औषध पुरवठा करणारी होलसेल दुकाने गेल्या आठ दिवसापासून बंद आहेत या होलसेल दुकानात काम करणारे कामगार येत नसल्याने दुकाने बंद ठेवावी लागत असल्याचे चालकांचे म्हणणे आहे त्याशिवाय अनेक होलसेल दुकानात आवश्यक असलेली औषधे मिळत नाहीत, वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे, पुण्यामुंबईहुन येणारी औषधे उपलब्ध होत नाहीत त्यामुळे काही होलसेल औषध दुकानदारांनी त्यांची दुकाने बंद ठेवली आहेत परिणामी औषध दुकानात औषधांची टंचाई जाणवत आहे.




























































