तो कोरोनाग्रस्त मेरठचाच, अमरावतीची नाहक बदनामी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो- प्रातिनिधीक

अमरावतीत कोरोनाग्रस्त म्हणून चर्चेत आलेला तो कोरानाग्रस्त अमरावतीचा नसून तो पंजाबमधील मेरठचा असल्याने चौकशीअंती स्पष्ट झाले आहेत. या संदर्भात अमरावती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी तशी माहिती पत्रकारांना दिली.

मूळचा मेरठचा असलेला हा कोरोनाग्रस्त इंदूरवरून अमरावतीला 9 मार्च रोजी आला होता. त्याने येथील मुस्लीमबहुल वस्तीत मुक्काम सुद्धा केला. त्यानंतर तो दुसर्‍याच दिवशी मेरठला रवाना झाला. याची माहिती जिल्हाधिकार्‍यांना मिळाल्यानंतर त्याचवेळी संबंधित कोरोनाग्रस्ताची चौकशी करण्यात आली. संबंधित रुग्ण हा नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहिला होता. त्याचा ज्या व्यक्तींशी अमरावतीत संबंध आला त्यांच्याशी देखील संपर्क साधून त्यांना क्वॉरंटाइन करण्यात आले होते. त्यांची तपासणी केल्यानंतर हे सर्वजण निगेटिव्ह असल्याचे दिसून आले, असेही जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

दरम्यान, अमरावतीत कोरोनाचा रूग्ण आढळून आल्याच्या वृत्ताने अमरावतीत खळबळ उडाली होती. याबाबत वृत्तवाहिनी तसेच व्हाटसअ‍ॅपमध्ये संदेश फिरला. त्याची दखल जिल्हा प्रशासनाने घेऊन संबंधित रूग्णाला अमरावती येथे कोरोना झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. 9 मार्च रोजी अमरावतीवरून हा रूग्ण मेरठकडे रवाना झाल्यानंतर प्रवासात त्याचा संबंध कोरोनाग्रस्तांशी आला. मेरठमध्ये गेल्यानंतर त्याची तपासणी केली असता संबंधित व्यक्ती ही कोरोनाग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यासोबत संपर्क आलेल्या ४ जणांनासुध्दा कोरोना झाल्याचे उघड झाले आहे.