
उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातून फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने आपल्या मृत आईला कागदोपत्री ‘जिवंत’ दाखवून तब्बल ४४ लाख रुपयांची पेन्शन लाटल्याचे उघड झाले आहे. २०१8 मध्ये त्या व्यक्तीच्या आईचा मृत्यू झाला होता. प्रेम सिंह असे त्या आरोपीचे नाव असून त्याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेरठच्या दौराला भागातील रहिवासी असलेल्या शांती देवी या स्वातंत्र्यसैनिक पेन्शन योजनेच्या लाभार्थी होत्या. त्यांचे पती सुरजन सिंह हे स्वातंत्र्यसैनिक होते. शांती देवी यांचा ९ डिसेंबर २०१८ रोजी मृत्यू झाला होता. मात्र, त्यांचा मुलगा प्रेम सिंग याने आईच्या मृत्यूची माहिती लपवून ठेवली. प्रेम सिंह याने काही बनावट कागदपत्रे तयार केली. दरवर्षी बँकेत सादर करावे लागणारे ‘हयातीचे प्रमाणपत्र’ (Life Certificate) खोट्या स्वाक्षऱ्या आणि कागदपत्रांच्या आधारे सादर केले. यामुळे शांती देवी जिवंत असल्याचा समज बँकेचा झाला आणि त्यांच्या खात्यात पेन्शनची रक्कम जमा होत राहिली. अशा प्रकारे २०१८ पासून २०२५ पर्यंत आरोपीने ४४ लाख रुपयांहून अधिक रक्कम बेकायदेशीरपणे काढली.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) सकौती टांडा शाखेचे व्यवस्थापक नीरज कुमार यांनी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी सरधना उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना (SDM) यासंदर्भात पत्र लिहून तक्रार दिली. स्थानिक स्तरावर चौकशी केली असता शांती देवी यांचा मृत्यू अनेक वर्षांपूर्वीच झाल्याचे समोर आले.

























































